नवी दिल्ली : केंद्र सरकारने संसदेत अविश्वास प्रस्तावाचा पराभव केला आणि देशभरात नकारात्मकता पसरवणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. क्षेत्रीय पंचायती राज परिषदेस संबोधित करताना ते बोलत होते.
पूर्व भारतातील देशाच्या विकासाचा एक मजबूत स्तंभ आहे. म्हणूनच, पूर्व भारतातील सर्व प्रतिनिधींना भेटणे आणि त्यांच्याशी बोलणे खूप महत्वाचे आहे. आम्ही संसदेत विरोधकांच्या अविश्वासाचा पराभव केला आणि नकारात्मकतेलाही उत्तर दिले आहे. विरोधी पक्षाचे लोक चर्चेदरम्यानच सभागृह सोडून पळून गेल्याचे स्पष्ट झाले. त्या लोकांना मतदान व्हायला नको होते. कारण मतदान झाले असते तर अहंकारी युतीचा बुरखा फाटला असता आणि तेच त्यांना नको असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.
मणिपूरवर सविस्तर चर्चा होणे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, प्रत्यक्षात काय झाले, ते देशाने बघितले आहे. अशा संवेदनशील विषयावर चर्चा झाली असती तर मणिपूरच्या जनतेला हायसे वाटले असते. तो प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी तोडगा निघाला असता, पण विरोधी पक्षाच्या लोकांना त्यावर चर्चा करायची नव्हती. कारण मणिपूरचे वास्तव विरोधकांना सर्वात जास्त त्रासदायक ठरणार असल्याची जाणीव असल्यानेच विरोधकांनी गदारोळ घातल्याचा टोला पंतप्रधानांनी यावेळी लगाविला आहे.