कोल्हापूर : कोल्हापूरातील मनुग्राफ इंडिया कंपनीचे संस्थापक अध्यक्ष सनतभाई शहा यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबई येथे शुक्रवारी पहाटे ही घटना घडली आहे. ते ९२ वर्षांचे होते.
सनतभाई शहा यांनी कोल्हापुरमधील शिरोली एमआयडीसीमध्ये १९७२ मध्ये मशिनेन फॅब्रिक पॉलिग्राफ इंडिया लिमिटेड म्हणजेच आताची मनुग्राफ इंडिया या कंपनीची स्थापना केली होती. त्यांच्या या कार्यामुळे कोल्हापुरची एक वेगळी ओळख निर्माण झाली. शहा यांच्या निधनामुळे मनुग्राफ इंडिया कंपनीवर दुखाचे सावट पसरले आहे. त्याच्यानंतर त्यांची मुले संजय शहा व प्रदीप शहा यांनी कंपनीची धुरा सांभाळली आहे.
सनतभाई शहा यांनी तत्कालीन पूर्व जर्मनीमधील कंपनी वेब पॉलिग्राफच्या सहकार्याने विविध मशिनच्या माध्यमातून ऑफसेट तंत्राची देशाला ओळख करून दिली. त्यानंतर १९८८ मध्ये प्लामाग प्लूएन जर्मनी यांच्याशी संयुक्तपणे प्लामाग इंटरनॅशनलची स्थापना केली.
पुढे त्यांनी मनुग्राफ इंडिया या कंपनीच्या माध्यमातून अत्याधुनिक वृत्तपत्र छपाई यंत्रांचे उत्पादन सुरू केले. शहा यांनी उपलब्ध कुशल मनुष्यबळ व पोषक वातावरण याचा अभ्यास करून कंपनी स्थापन करण्यासाठी कोल्हापूरची निवड केली होती.