मातृशक्तीचा गौरव करणार्‍या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

12 Aug 2023 20:54:05
Article On Punyashlok Ahilya Devi Holkar

स्वाम्यमात्यश्च राष्ट्रं दुर्ग: कोशो बलं सुहृत्।
परस्परोपकारीदं सप्तांगं राज्यमुच्यते॥
कामंदक हे इसवी सनाच्या सातव्या शतकांत जन्मले, असे पुराण व इतिहासतज्ज्ञांचे मत आहे. आर्य चाणक्यांच्या ग्रंथांत कालमानानुसार फेरबदल करून कामंदकांनी आपला ग्रंथ लिहिला. वरील श्लोकांत राज्याची सात अंगे निवेदिली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे अमात्य व छत्रपतींचे पश्चात पाव शतकभर झालेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धांचे सूत्रधार रामचंद्रपंत अमात्य यांनी लिहिलेला (आज्ञापत्र) ग्रंथ हा कामंदकांचेच प्रतिबिंब आहे. तेव्हा मराठेशाहीतील राजनीतीचा तराजू तोच ग्रंथ धरून चालण्यास हरकत नसावी, असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मत होते. त्यांनी (१) स्वामी, (२) अमात्य म्हणजे मंत्री, (३) राष्ट्र म्हणजे प्रजाजन, (४) दुर्ग म्हणजे किल्ले, (५) कोश म्हणजे भांडार, (६) बल म्हणजे सैन्य व (७) आप्त इष्टगण अशा परस्परांस मदत करणार्‍या राज्ययंत्राच्या अंगांना मजबूत करून राज्यकारभार केला.त्यांच्या दिनचर्येची नोंद वासुदेव ठाकूर यांच्या ‘होळकरशाहीचा इतिहास’ या ग्रंथात आढळून येते, ती खालीलप्रमाणे आहे.

अहिल्याबाई या सूर्योदयापूर्वी घटका-अडीच घटका उठून स्नान करीत व नंतर पूजाअर्चा करीत. या नंतर त्या नियमित कालपर्यंत पुराण श्रवणास बसत. नंतर दाने देऊन त्या आपणासमक्ष ब्राह्मणांस भोजने घालीत. हे होत आहे, तोच त्यांचे ताट वाढून येई. त्यांचे स्वतःचे भोजनास सारे शाकभाज्यांचे पदार्थ असत. त्या आपले भोजन आटपल्यावर पुनः काही वेळ परमेश्वर स्तवन करून थोडा वेळ वामकुक्षी घेत. नंतर पोशाख करून त्या सरकारी कामकाज करावयास दरबारात जात असत. जेव्हा दरबारात जात तेव्हा बहुधा दोन प्रहर होत. तेथे सूर्यास्तापर्यंत कामकाज चाले. याउपर एक प्रहर पूजाअर्चा फराळ वगैरे कृत्यांत जाई. मग रात्री सरकारी काम मध्यरात्रीपर्यंत चाले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी २८ वर्षे राज्यकारभार करताना अनेक नवीन सामाजिक बदल घडवून आणले. तसेच, भेदाभेद करणार्‍या प्रथा लाथाडून समाजाला दिशा देण्यासाठी महिलांना पुढे आणण्यासाठी सर्वात प्रथम प्रयत्न केला. स्त्री केवळ भोगवस्तू आहे, असा विचार करणार्‍या समाजाची भावना अहिल्यादेवींनी बदलण्यासाठी माळव्यातील स्त्रियांना कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी दिली. एका पुरुषाच्या यशात स्त्रीचा वाटा असतो. याशिवाय प्रयत्न करणारी स्त्री पुरुषांच्या मदतीने यश मिळवू शकते, वेळप्रसंगी युद्धात असो की संकटात, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या सोबत खंबीरपणे उभी राहू शकते, असा सकारात्मक विचार स्त्रियांच्या मनामध्ये रुजवला. अहिल्यादेवींवर सासुबाई श्रीमंत गौतमाबाईसाहेब, हरकुबाईसाहेब यांचा मोठा प्रभाव होता. त्यांना महिलांसाठी काम करताना ननंद उदाबाईसाहेब वाघमारे यांची मोठी मदत झाली. मुलगा आणि मुलगी ही रथाची दोन चाके असून, त्यांनी स्वतः सक्षम झाल्याशिवाय त्यांचेवर राज्यकारभाराची जबाबदारी देता येणार नाही, म्हणून सासरे थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांनी मुलगा-मुलगी असा भेद न करता आपल्या मुलांना स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी देऊन त्यांना मोकळीक दिली होती. अहिल्यादेवी सून म्हणून आल्यानंतर त्यांनादेखील पुढे आणण्याचे मल्हारराव आणि त्यांची पत्नी गौतमाबाईंनी केले होते.

१७५४ मध्ये खंडेराव होळकर यांच्या निधनानंतर अहिल्यादेवी सती जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र, मल्हाररावांनी त्यांची समजूत काढून त्यांना वेळ आणि काळाची गरज लक्षात आणून सतीचा निर्णय मागे घ्यायला लावला, तर खंडेरावांसोबत त्यांच्या इतर बायका सती गेल्या. त्यामुळे सतीची परंपरा मोडली नाही.होळकरशाहीचा डोल्हारा सांभाळण्यासाठी पुत्रवधू अहिल्यादेवींना थांबवून मल्हाररावांनी समाजात असलेल्या प्रथा आणि परंपरेत बदल केला त्याचा मोठा परिणाम पुढे मराठेशाहीत दिसून येतो. अहिल्यादेवींनी विधवा महिलांना दत्तक घेण्याचा अधिकार दिला. विधवांच्या संपत्तीवर फक्त त्या स्त्रीचा अधिकार असून, ती तिच्या घराण्यांच्या वंश वृद्धीसाठी विधवा स्त्री दत्तक मूल घेऊ शकते, यासाठी सरकारी खर्चाने दत्तक विधान करण्यात येऊन ३० चोळीबांगडी आणि लेकरास कपडे आणि खाऊ देण्यात, यावा असा नियम लागू केला. यामुळे अनेक सावकार तसेच सरदार, व्यापारी, घरदांज घराण्यातील विधवा स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला. विधवा स्त्री आणि तिच्या संपत्तीचे संरक्षण करण्याचा हुकूम जारी करण्यात आल्याने त्यातून सामाजिक बदल घडून आला.

दि. १४ जानेवारी १७६१ मध्ये पानिपत युद्धात धारातीर्थी पडलेल्या सरदारांच्या विधवा स्त्रिया, मुली व निराधार झालेल्या आईस अहिल्यादेवींनी कसण्यासाठी जमिनी तसेच साडी विणकामाच्या माध्यमातून रोजगार दिला. त्यांच्या मुलामुलींचे सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करुन स्वतःच्या खासगीतून त्यांनी कन्यादान केले. ‘अनाथांची माऊली’ म्हणून अहिल्यादेवींनी या उपाययोजना केल्या आणि अमलात आणल्या. त्यामुळे अनेक निराश्रितांचा कल महेश्वरकडे होता.

महिलांची फौज

अहिल्यादेवी होळकर यांनी दि. १० डिसेंबर १७६७ रोजी होळकर राजगादीचा कारभार करण्यास प्रत्यक्षात सुरुवात केली. सासरे मल्हारराव होळकर आणि नातू मालेराव होळकर यांच्या दुःखातून स्वतःला सावरत असताना होळकरांचे फितूर दिवाण गंगोबा तात्या यांच्या मदतीने राघोबा दादा पेशवे माळव्यावर चालून आले.राघोबा दादा कर्जबाजारी असल्याने त्यांनी होळकरांचे राज्य ताब्यात घेऊन अहिल्यादेवींना तीर्थयात्रेला पाठवून द्यावे, असा सल्ला गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी दिला होता. हा कट धारमध्ये रंगराव ओढेकर यांच्या मदतीने शिजला होता. रंगराव ओढेकर हा धारची गादी बळकावण्याच्या प्रयत्नात होता, त्यासाठी त्याने राघोबा दादाची मदत घेतली होती. राघोबा दादाने फौज घेऊन होळकरांच्या राज्यात प्रवेश करायचे, असे ठरवून निघाला असता त्याच्या कारस्थानाची गुप्त बातमी नणंद उदाबाई वाघमारे आणि शिवाजी गोपाळ यांनी अहिल्यादेवींना कळवली.

दरम्यान, होळकरांची राजधानी इंदौरवरून महेश्वरला नुकतीच स्थलांतरित केली होती. तसेच, होळकरांची फौज तुकोजीराव होळकर यांच्या नेतृत्वाखाली मोहिमेवर असल्याने महेश्वर येथे केवळ राखीव फौज होती. यावेळी अहिल्यादेवींनी महेश्वर आणि परिसरातील महिलांना तातडीने एकत्र करून आलेल्या प्रसंगाची जाणीव करून दिली. संकटकाळात महिलांनी घरात न बसता आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. जमलेल्या महिलांची एकजुट पाहून त्यातील महिलांना वेगवेगळ्या जबाबदार्‍या लगेच वाटून दिल्या.

काही महिलांना गुप्तहेर म्हणून पाठवले, तर काही महिलांना महेश्वर किल्ल्यात तोफा चालवण्याचे प्रशिक्षण दिले. तसेच, अडगळीच्या वाटा बंद करून आदिवासी महिलांना शस्त्र देऊन जांबघाट बंद केला. देपालपूरजवळ क्षिप्रेच्या काठावर घोडेस्वार महिलांची फौज उभी केली. दिमतीला बीजली आणि ज्वालाभवानी तोफा पाठवून दिल्या. शेजारच्या शासकांनादेखील राघोबा दादांच्या कारस्थानाची माहिती देऊन फौज पाठवण्याचे आवाहन केले. तुकोजीराव लगेच महेश्वरकडे रवाना झाले. महादजींनी राघोबांना थोरले सुभेदार मल्हाररावांच्या पराक्रमाची आठवण करून दिली. अहिल्यादेवींनी पुणे दरबारात पत्र पाठवून राघोबांच्या कारस्थानाची माहिती देताच माधवराव पेशवे यांनी अहिल्यादेवींना राज्य रक्षणाचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. तसेच, राघोबा दादांना पेशवे न समजता त्यांचेवर शत्रू म्हणून तलवार चालवावी, असे उत्तरादाखल पत्र पाठवून अहिल्यादेवींना पाठिंबा दिला. अहिल्यादेवींनी युद्ध जिंकण्याची तयारी करून पुन्हा राघोबा दादास पत्र पाठवून सांगितले की, ‘’होळकरांचे राज्य हे पराक्रम, शौर्य, बलिदान आणि त्यागातून उभे राहिलेले आहे. त्याचे रक्षणासाठी आम्ही आमचे रक्त सांडायला तयार आहोत.

युद्धभूमीत आम्ही स्वतः महिलांसोबत खांद्यावर बासडा घेऊन तुमचे स्वागताला उभे राहू. या युद्धात आमचा पराभव झाल्यास समाज आम्हाला स्त्री समजून माफ करेल. मात्र, तुम्हाला कुठेही तोंड दाखवायला जागा उरणार नाही. आमच्या पूर्वजांनी स्वराज्य विस्तारासाठी स्वतःचे रक्त सांडलेले आहे. त्यामुळे आम्हाला बलिदानाचा वारसा आहे. हे आपण विसरू नये. परिस्थितीचे गांभीर्य आणि अहिल्यादेवींचे पत्र वाचून राघोबांनी आपण युद्धासाठी येत नसून, सांत्वनासाठी येत असल्याचे दुसरे पत्र पाठवून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरम्यान झालेल्या सर्व घटनांची माहिती देत राघोबांना स्वतःची चूक कबूल करण्यास भाग पाडले. राघोबांनी महेश्वर येथे येऊन अहिल्यादेवींची भेट घेतली. झालेल्या चुकीबद्दल त्यांची क्षमा मागितली. क्षमा मागणार्‍या राघोबांना अहिल्यादेवींनी मोठ्या मनाने माफ केले. परंतु, होळकर आणि पेशवे वेगळे नाहीत, थोरले बाजीराव आणि सासरे मल्हारराव यांनी निर्माण केलेली ही दौलत आहे. तुम्हाला पेशवे म्हणून येण्यासाठी होळकरांचे दरवाजे नेहमीच खुले असतात. कुरापती दिवाण चंद्रचुड यांच्या कानभरणीला आपण बळी पडून मोठी चूक केली आहे. निरुत्तर झालेल्या राघोबांना अहिल्यादेवींनी कर्जातून बाहेर येण्यासाठी आर्थिक मदत केली, तर दिवाण गंगोबा तात्या यांना कैदेत टाकले होते.
 
श्रीमंत माधवराव पेशवे यांनी अहिल्यादेवींना पाठवलेले खालील पत्र बोलके वाटते.

शिक्का माधवराव बल्लाळ मुख्य प्रधान
इ. स. १७६७
राजश्री अहिल्याबाई होळकर गोसावी यांसी अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य. स्नेहांकित माधवराव बल्लाळ पेशवे पंतप्रधान अनेक आशीर्वाद. तीर्थस्वरूप राघोबादादा पेशवे फौजेची तयारी करून नजराणा घेण्याकरिता किल्ले महेश्वरास येत आहेत. म्हणून समजले. त्यांस विनंती आहे की, माझे सासरे मल्हारराव होळकर यांनी एकनिष्ठपणे धन्याची सेवा करून सर्व आयुष्य मुलूख सर करण्यांत घालविले. माझा नवरा खंडेराव होळकर यांनींही सरकारी कामगिरीत देह सोडला. चिरंजीव मालेराव होळकर मृत्यू पावले. मी खासगी व दौलत असे दोन्ही अधिकार आजपावेतो चालवून होळकरांचे नाव कायम ठेविले असून, तुकोजी होळकर सरकार चाकरीचे उपयोगी समजून यांचे नावे वस्त्रे यावी म्हणून विनंती करिता दादासाहेब पेशवे नजराण्याचे निमित्याने नाशास प्रवृत्त होऊन येत आहेत. म्हणून पत्र आल्यावरून लिहिण्यात येते की महेश्वर वगैरे ही जागा खासगीची होळकरांचे कुटुंबास इनाम जहागीर दिलेली असल्यानें तुमचा पूर्ण हक्क आहे. म्हणून ती ॥ दादासाहेबांस निक्षून ताकीद झाली आहे व तुकोजी होळकर यांचे नांवें सनद व कपडे तयार होऊन येत आहेत. आता काडीमात्राचा अंदेशा न धरिता सुरळीतपणे चालत आल्याप्रमाणे चालविले जाईल. जाणिजे चंद्र १९ माहे रजब, बहुत काय लिहिणे. लेखन सीमा.

हैदराबाद राज्यात दुष्काळ पडल्याने तसेच निजामशाही आर्थिक संकटात सापडल्याने तेथील हातमागावर काम करणारे कापड विणकाम करणारे लोक महेश्वर येथे राजाश्रयासाठी अहिल्यादेवींकडे गेले होते. अहिल्यादेवींनी या सर्वांना राजाश्रय देत कापड विणकाम करण्यासाठी सुत, चरखा आणि राहायला जागा उपलब्ध करून दिली. त्यातून महेश्वरी साडीची निर्मिती सुरू झाली. अहिल्यादेवींनी महेश्वरी साडीवर परिसरातील फुलांचा तसेच आदिवासी महिलांनी तयार केलेल्या चित्रांचा वापर करून सुंदर, अशा साड्या तयार केल्या. ज्यातून नवीन बाजारपेठ व रोजगार निर्मिती होऊ शकली. साडी विणकामात महिलांना संधी दिल्याने हजारो महिलांच्या हाताला काम मिळाले.

इ. स. १७८७ मध्ये जेजुरीत खाटकांचा मोठा उपद्रव होत असल्याने अहिल्यादेवींनी खाटकांच्या नावे खालीलप्रमाणे ताकीद पत्र पाठवले होते. ताकीद पत्र खाटिक क्षेत्र जेजुरीकरास. तुझे दुकान क्षेत्र मजकुरी कारखान्यावर आहे. त्याचे प्रयोजन नाही. तरी तू देखत चिठ्ठी दुकान उठवून घेणे. राहिल्यास पारिपत्य केले जाईल छ. २२ रविलाखर.

रामभाऊ लांडे
(लेखक होळकर राजघराणे, इंदौर अभ्यासक आहेत.)
९४२१३४९५८६

Powered By Sangraha 9.0