नवी दिल्ली : लोकसभेतून निलंबित झाल्यानंतर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोठी घोषणा केली आहे. निलंबन मागे न घेतल्यास आपण सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो, असे ते म्हणाले. अधीर रंजन चौधरी यांना संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात गैरवर्तन केल्याप्रकरणी लोकसभेतून निलंबित करण्यात आले होते.
अधीर रंजन चौधरी म्हणाले की, "मणिपूरबाबत पंतप्रधानांच्या विधानाची आम्ही संसदेत मागणी केली होती. संसदेचे कामकाज चालावे अशी आमची इच्छा होती. जेव्हा आमचे म्हणणे ऐकले गेले नाही तेव्हा पंतप्रधान संसदेत बोलतील याची खात्री करण्यासाठी आम्हाला अविश्वास प्रस्ताव आणण्याचा शेवटचा मार्ग पत्करावा लागला. अविश्वासाची चर्चा प्रलंबित असताना सरकारने संसदेत विधेयके मांडली. अनेक विधेयकांवर विरोधकांना मत मांडण्याची संधी मिळाली नाही."
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी १९७८ मध्ये आणण्यात आलेल्या अविश्वास ठरावाची आठवण करुन दिली ते म्हणाले की, "१९७८ मध्येही सभागृहात अविश्वास प्रस्ताव आणला गेला होता. त्यावेळी त्याच दिवशी या प्रस्तावावर चर्चाही सुरू झाली होती. त्यामुळे सभागृह सुरळीत चाललं होत.
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी लोकसभेत काँग्रेसचे गटनेते असूनही संसदेत सतत गोंधळ घालत असतात. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातही अपशब्द वापरले होते. त्यानंतर सरकारी पक्षाने त्यांच्या माफीची मागणी केली होती. पण अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितली नाही. त्यामुळेच लोकसभा अध्यक्षांनी त्यांना संसदेतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला.