मुंबई : देशात गेल्या दोन महिन्यांपासून टमाटरचे भाव प्रचंड वाढले आहेत. अतिवृष्टीमुळे पीकांचे नुकसान होऊन टमाटरचा तुटवडा निर्माण झाला आहे. यातूनच टमाटरचे भाव २०० रुपये किलोपर्यंत जावून पोहोचले आहे.
या सगळ्याचा फटका सामान्य जनतेला बसत असतानाच आता रोजच्या वापरातील कांद्याचेही भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे कांद्याच्या उत्पादनात घट होत आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा-बटाटा मार्केटमध्ये कांद्याचे भाव स्थिर होते. परंतू, गेल्या दोन दिवसांत यामध्ये अचानक २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. गणेशोत्सवापर्यंत हे भाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याआधी १५ ते १८ रुपये प्रतिकिलो असलेला कांदा आता १८ ते २२ रुपये किलोने विकला जात आहे. कांद्याच्या या वाढलेल्या किमती बाजारात नवीन कांदा येईपर्यंत अशाच राहाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.