पुणे : पुण्यातून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे बंद केल्यामुळे येथील एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
दौंड जिल्ह्यातील जावजीबुवा वाडी परिसरातील ही घटना असून अरविंद देवकर असे मृत शिक्षकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद देवकर यांची दोन महिन्यांपूर्वी जावजीबुवा वाडी येथील प्राथमिक शाळेत बदली झाली होती. या शाळेत देवकर हे एकच शिक्षक होते. त्यांनी आपल्या शाळेत स्वच्छता मोहिम सुरु केली.
यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळा स्वच्छ करण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी ही गोष्ट त्यांच्या पालकांना सांगितली. यातून ९ मुलांच्या पालकांनी संतापून आपल्या मुलांचे नाव शाळेतून काढून घेतले. या शाळेत फक्त १० मुले शिक्षण घेत होते. त्यातील ९ मुलांना काढून दुसऱ्या शाळेत प्रवेश देण्यात आला. त्यानंतर शाळेत केवळ एक मुलगी शिल्लक राहिली. तिनेही दुसऱ्या दिवशीपासून शाळेत येणे बंद केले.
या सगळ्या प्रकारातून अरविंद देवकर यांना नैराश्य आले व याच नैराश्यातून त्यांनी शाळेतच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत्यूपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहिली असून त्यात हा उल्लेख केला आहे.