नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक कट्टरवाद्यांशी सामना करण्यासाठी युकेने नवा फंड जाहीर केला आहे. भारत आणि युके कट्टरतावादाशी लढण्यासाठी संयुक्त कार्य दलाच्या स्थापनेसाठीदेखील काम करत आहेत.
भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त म्हणाले की भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि युकेचे संरक्षण मंत्री टुगेनहाट यांच्यात झालेल्या बैठकीत त्यांनी नवीन निधीची घोषणा केली आहे, ज्यामुळे खलिस्तान समर्थक अतिरेक्यांना सामोरे जाण्यासाठी ब्रिटनची क्षमता वाढेल. ९५ हजार पौंडांची (सुमारे एक कोटी रुपये) गुंतवणूक करून युके सरकार खलिस्तान समर्थक अतिरेक्यांविरोधात कारवाई कठोर करणार आहे. भारत आणि युकेमध्ये जॉइंट रॅडिकलायझेशन टास्क फोर्स स्थापन करण्याची प्रक्रिया आधीच सुरू आहे, असेही ते म्हणाले.
ब्रिटनचे संरक्षण मंत्री टुगेनहाट तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. भारत ब्रिटनसमोर सातत्याने खलिस्तानी दहशतवादाचा मुद्दा मांडत आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तावर खलिस्तान्यांनी केलेल्या हल्ल्याविरोधा भारताने युकेला सुनावले होते. या प्रकरणाचा तपासही राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्यात आला आहे.