मंदीची तेजी आणि चीन

11 Aug 2023 21:21:29
China decries US 'economic coercion' over investment ban

चीनची अर्थव्यवस्था एखाद्या ‘बॉम्ब’सारखीच! कारण, ती कधीही फुटू शकते. चीन सगळ्यात वाईट अर्थव्यवस्थेच्या काळाला सामोरा जात आहे,” असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन नुकतेच म्हणाले. इतके बोलूनच ते थांबले नाहीत, तर त्यांनी चीनचा फक्त संताप अन् संताप होईल, मात्र जगाला खरे वाटेल, अशीही टिप्पणी केली. बायडन पुढे म्हणाले की, “वाईट माणसं वाईट काळात आणखीन वाईट वागतात.” अर्थात, वाईट माणूस म्हणजे चीन, असे बायडन यांचे म्हणणे. चीनने जगभरात इतकी अपकीर्ती मिळवली आहे की, सांगता सोय नाही. विस्तारवाद असू दे, आर्थिक फसवणूक असू दे, इतर देशांतर्गत हिंसा, कलह माजवणे असू दे, घुसखोरी असू दे, या सगळ्यामध्ये चीन जगभरात खलनायकाच्या भूमिकेतच. काय खोटे, काय खरे, अजूनतरी सिद्ध नाही. मात्र, कोरोनाचा निर्माता अशीही कुख्याती चीनने मिळवली. कोरोनानंतर तर चीनच्या बदनामीला अजून चारचाँद लागले, असेच म्हणावे लागेल.

बायडन यांनी चीनच्या अर्थव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. इतकेच नाही, तर राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुद्द्यावर अमेरिकेने चीनमध्ये गुंतवणुकीवरही निर्बंध आणले आहेत. यापूर्वी चीनच्या मोठ्या लोकसंख्येचा फायदा घेण्यासाठी अनेक पाश्चात्य त्यातही अमेरिकेचे उद्योगपती चीनमध्ये गुंतवणूक करायचे. मात्र, आता अमेरिकेने ‘सेमीकंडक्टर’, क्वांटम कंम्प्युटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित प्रौद्योगिकी क्षेत्रामध्ये अमेरिकेने चीनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी निर्बंध लादले आहेत. यामुळे चीनला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. अमेरिकेने मैत्रिपूर्ण वातावरणात गुंतवणूक सुरू ठेवावी, असे चीनचे म्हणणे. तशी वारंवार सूचना आणि मागणीही चीनने अमेरिकेकडे केली. मात्र, राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर अमेरिकेने चीनमध्ये गुंतवणूक करण्यास नकारच दिला.

अमेरिकेचा गुंतवणूक केलेला पैसा वापरून चीन शिरजोर होत आहे, असेही अमेरिकेतील बहुसंख्य लोकांना वाटते. अमेरिकेने गुंतवणुकीवर निर्बंध लादल्यानंतर चीनच्या प्रशासनाचे मुखपत्र ’ग्लोबल टाईम्स’ने अमेरिकेच्या निर्णयाबाबत लिहिले की, “अमेरिकेचा हा निर्णय अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम करेल. अमेरिकेला या निर्णयाचे परिणाम आर्थिक स्तरावर भोगावे लागतील वगैरे.” पण, अशीच धमकीवजा सूचना चीनने काही महिन्यांपूर्वी भारतालाही दिली होती. काय झाले होते, तर हैदराबाद येथे ‘मेघा इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर’ सोबत एक अब्ज डॉलरचासंयुक्त गुंतवणूक आणि तेलंगण येथे एक ‘ईव्ही-मॅन्युफॅक्चरिंग प्लांट’ उभारण्यासाठी चीनने भारतापुढे प्रस्ताव ठेवला. या दोन्ही प्लांटमुळे भारताची आर्थिकता वाढून देशातली बेरोजगारी कमी होण्यास हातभार लागणार आहे. अशी चिनी कम्युनिस्ट पार्टीचे धार्जिणे वृत्तपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ने माहिती दिली.

मात्र, प्रस्ताव देणारा चीन दुसरीकडे गलवान खोर्‍यात आगळीक करत होता. त्यामुळे भारताने चीनच्या गुंतवणूक प्रस्तावाला नकार तर दिला. भारताने गुंतवणूक प्रस्ताव नाकारल्यानंतर चीनच्या ‘ग्लोबल टाईम्स’ने लगेच जाहीर केले की, ’भारताने चीनचा गुंतवणूक प्रस्ताव नाकारला, याचे परिणाम भारताला आर्थिक स्तरावर भोगावे लागतील.’ मात्र, भारताने या सगळ्या धमकीवजा सूचनेला अजिबात भीक घातली नाही. तसेच, चीनच्या म्हणण्यानुसार, भारताच्या अर्थव्यवस्थेवर काही परिणामही झाला नाही. कारण, चीनचा आर्थिक डोलारा कोसळेल, अशी स्थिती. अमेरिका काय किंवा भारत काय, यांच्या आर्थिक सहभागाशिवाय चीन सावरू शकत नाही.
 
चीनमध्ये महागाई झपाट्याने कमी होत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी महागाई दर ०.३ टक्क्यांनी घसरला. त्यामुळे वस्तूंच्या किमती ढासळल्या. भाजीपाल्यांच्या किमती १.५ टक्क्यांनी तर डुकराच्या आणि इतर मांसाची किंमत २६ टक्क्यांनी घसरली. परिणामी, चिनी कंपन्याचा नफा कमी झाला आहे. तसेच, कोरोनानंतर चीनच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. निर्यातीमध्ये प्रचंड घट झाली, तर आयातीमध्ये १२.४ टक्के घट झाली. चीनमध्ये बेरोजगारीचा दर गेल्या चार वर्षांत दुप्पट झाला आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणजे चीनची अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या तयारीत आहे.

म्हणूनच जो बायडन म्हणाले की, ‘चीनची व्यवस्था म्हणजे ‘बॉम्ब’ आहे, तो कधीही फुटेल.’

९५९४९६९६३८

 
Powered By Sangraha 9.0