सिद्धू मूसेवाला हत्याकांड! सचिन बिश्नोईच्या अझरबैजानमध्ये आवळल्या मुसक्या; लवकरच भारतात आणणार

01 Aug 2023 17:06:37
siddhu musewala 
 
मुंबई : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार सचिन बिश्नोई उर्फ​सचिन थापन याला अझरबैजानमधील बाकू येथून भारतात आणण्यात आले आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे पथक अझरबैजानला गेले होते. सचिन थापन हा कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा पुतण्या आहे.
 
मूसेवालाच्या हत्येपूर्वी तो बनावट पासपोर्ट बनवून फरार झाला होता. तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने चौकशीदरम्यान सिद्धू मूसेवालाचा खून केल्याचे सांगितले होते. थापनच्या प्रत्यार्पणामुळे सिद्धू मूसेवाला खून प्रकरणात अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. लॉरेन्सच्या कबुलीपूर्वी, थापनने सिद्धू मूसेवाला मारल्याचा दावा केला होता.
 
२९ मे २०२२ रोजी प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी स्वतः सचिनने घेतली होती. मूसेवाला याची हत्या झाली तेव्हाच सचिन बिश्नोई तपास यंत्रणांच्या रडारवर आला होता. सचिन कॅनडामध्ये बसलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रारच्या सतत संपर्कात होता.
 
यादरम्यान पोलिस आणि तपास यंत्रणांना संशय येऊ नये म्हणून सचिन बिश्नोई फोनवर बोलत असताना गँगस्टर गोल्डी ब्रारला त्याच्या सांकेतिक नावाने हाक मारायचा. एजन्सींचा दावा आहे की सचिन बिश्नोईने गोल्डी ब्रार, तुरुंगात टाकलेल्या कला जाठेदी आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्याशी सांकेतिक शब्दात बोलून सिद्धू मूसेवाला याच्या हत्येचा कट रचला होता.
 
हत्येनंतर सचिन बिष्णोईने संगम विहार परिसरातील पत्त्यावरून बनावट पासपोर्ट बनवला आणि त्यानंतर तो दुबईला गेला. बनावट पासपोर्टवर सचिन बिश्नोईचे नाव तिलकराज तुटेजा होते. सचिन बिश्नोईच्या वडिलांचे खरे नाव शिव दत्त आहे, परंतु बनावट पासपोर्टवर त्यांनी वडिलांचे नाव भीम सेन असे लिहिले होते. या पासपोर्टवरील त्याचा पत्ताही बनावट निघाला. हा पत्ता हाऊस नंबर ३३, ब्लॉक एफ-३, संगम विहार, दिल्ली होता.
 
 
 
Powered By Sangraha 9.0