मुंबई : फ्रेंच स्टंटबाज रेमी लुसिडीचा हाँगकाँगमधील ६८ मजली इमारतीवरून पडून मृत्यू झाला आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, लुसिडी ट्रेगंटर टॉवर कॉम्प्लेक्सवर चढत असताना तो कोसळला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेमी लुसिडी चढत असताना पाय घसरुन खाली पडला.
हाँगकाँगच्या अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, लुसीडीने इमारतीच्या गेटवरील सुरक्षा रक्षकाला सांगितले की तो ४० व्या मजल्यावर मित्राला भेटायला जात आहे. जेव्हा कथित मित्राने सांगितले की तो लुसिडीला ओळखत नाही, तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु लुसिडीने आधीच लिफ्टमध्ये प्रवेश केला होता.
पोलिसांना घटनास्थळी लुसीडीचा कॅमेरा सापडला आणि त्यात त्याच्या स्टंटचे अनेक व्हिडिओ आहेत. पोलिसांनी मृत्यूचे अधिकृत कारण जाहीर केलेले नाही. लुसीडीशी बोलल्याचा दावा करणाऱ्या एका कामगाराने सांगितले, 'जेव्हा मी विचारले की तो कुठे जात आहे, तेव्हा त्याने मला सांगितले की तो डोंगरावर चढणार आहे.' त्याच्या मृत्यूच्या काही वेळापूर्वी, त्याने हाँगकाँगच्या आकाशाचा फोटो पोस्ट केला होता.