देशातील १४० कोटी जनतेच्या चरणी पुरस्कार अर्पण : पंतप्रधान नरेंद्र मोदी
अमृतकाळ हा कर्तव्यकाळ
01-Aug-2023
Total Views | 78
पुणे : स्वातंत्र्याला वर्षाला ७५ वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. हा अमृतकाळ असून भारतासाठी खर्या अर्थाने तो कर्तव्यकाळ आहे. जग भारतामध्ये स्वत:चे भविष्य पहात आहे. भारत मानवतेसाठी आश्वासक वाटतो आहे. पायाभूत विकासासह संस्था निर्माण, त्यामधून व्यक्ती निर्माण आणि व्यक्ती निर्माणामधून राष्ट्र निर्माण हा विकासाचा रोडमॅप आहे. देशाला सामर्थ्यशाली बनविण्याचे काम सुरु आहे. लोकमान्य टिळकांनी पाहिलेल्या सशक्त, समृद्ध भारताचे स्वप्न साकार करणार असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार मी १४० कोटी जनतेच्या चरणी अर्पित करतो असे मोदी म्हणाले.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट आणि टिळक स्वराज संघाच्यावतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२३ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्मृतीचिन्ह, मानपत्र, केसरी प्रथम अंक, लोकमान्य टिळक वापरत ते उत्तरीय, एक लाख रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप होते. पुरस्काराची रक्कम मोदी यांनी नमामी गंगे प्रकल्पाला दान करीत असल्याची घोषणा केली. यावेळी, राज्यपाल रमेश बैस, ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रिय मंत्री सुशिलकुमार शिंदे, डॉ. दीपक टिळक, डॉ. रोहित टिळक, डॉ. गीताली टिळक-मोने, सरिता साठे, डॉ. प्रणति टिळक, रामचंद्र नामजोशी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, लोकमान्य टिळकांचे योगदान कोणत्याही घटनांच्या अनुषंगाने किंवा शब्दात जोखता येणार नाही. क्रांतीकारकांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव होता. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामाची दिशा बदलली. जनतेने त्यांना लोकमान्यता देण्यासोबतच लोकमान्य हा किताबही दिला. एक मोठा नेता कसा असावा, याचे सर्व पैलू आपल्याला लोकमान्य टिळकांच्या आयुष्यात दिसतात. समाज जोडण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाद्वारे सर्वांना सांस्कृतिक सुत्रात गुंगले. ते आधुनिक भारताचे निर्माते होते. व्यापक चिंतन, दूरदर्शी नेतृत्व, मोठ्या ध्येयाप्रती समर्पण या वैशिष्ट्यांसोबत त्यांनी संस्था निर्माणामधून व्यवस्था निर्माण केल्या. त्याग आणि बलिदानासोबत सहयोग आणि सहभागावरही भर दिला. लोकमान्य टिळक हे तरुणांसाठी आदर्श आहेत. भविष्याची जबाबदारी तरुणांच्या हाती त्यांनी दिली. त्यांनी शिक्षित आणि सक्षम तरुण घडवले. स्वातंत्र्यवीर सावरकरांची क्षमता लोकमान्य टिळकांनी ओळखली होती. सावरकरांनी परदेशात जाऊन शिक्षण घ्यावे आणि स्वातंत्र्यासाठी योगदान द्यावे, अशी त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी सावरकरांची शिफारसही केली होती. शिक्षण संस्था, वर्तमान पत्रे उभी करणे ही त्यांच्या दूरदृष्टीची उदाहरणे असल्याचे मोदी म्हणाले. लोकमान्यांनी जनतेत आत्मविश्वास निर्माण केला. त्यांचा भारताच्या संस्कृती, इतिहास आणि सामर्थ्यावर विश्वास होता. विश्वासाशिवाय विकास होत नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य मानसाचे मन ओळखतात. नऊ वर्षात त्यांनी केलेल्या लोककल्याणकारी कामांमुळे त्यांना लोकमान्यता मिळाली आहे. स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करण्यासाठी ते धडपडत आहेत. देशाचा मानसन्मान आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढवला आहे. जगभरात आर्थिक मंदी असताना देश आर्थिक प्रगती करतो आहे. आत्मनिर्भरद्वारे स्वदेशीचा नारा, ३७० कलम हटवले जाणे, राम मंदिर निर्मिती, वाराणसीचा कायापालट ही ऐतिहासिक कामे आहेत. लोकमान्यांना अपेक्षित असलेला सामर्थ्यवान भारत बनविण्याचे स्वप्न ते प्रत्यक्षात आणत आहेत. पुरस्काराचा हा क्षण ऐतिहासिक आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, टिळक पुरस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड झाली ही आनंदाची बाब आहे. यापूर्वी पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांच्या मांदीयाळीत मोदी बसले आहेत. या पुरस्कारासाठी त्यांना अंत:करणापासून शुभेच्छा देतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दीपक टिळक यांनी केले. या पुरस्कारामागील संकल्पना, भूमिका, आजवरची वाटचाल यासह लोकमान्यांच्या जीवनातील प्रसंगांना त्यांनी उजाळा दिला. पुरस्कारासाठी मोदी यांची निवड करण्यामागील भूमिका त्यांनी स्पष्ट केली. डॉ. रोहित टिळक यांनी मोदी यांचा परिचय करुनदिला.
मराठीमधून सुरुवात... अन पुण्यभूमीला नमन
पंतप्रधान मोदी यांनी मराठीमधून भाषणाला सुरुवात केली. मोदी म्हणाले, अनेक महानायक जन्माला घालणार्या या पुणे आणि महाराष्ट्राच्या भूमिला कोटीकोटी वंदन. आजचा दिवस माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे. मी उत्साहित आणि भावूकही झालो आहे. लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे जयंतीच्या दिवशी पुरस्कार मिळणे हे माझे भाग्य आहे. पुण्याची धर्ती पवित्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज, चाफेकर बंधू, सावित्रीबाई आणि महात्मा फुले दाम्पत्याची ही पुण्यभूमी आहे. दगडूशेठ गणपती मंदिर इथे आहे. देशात काशी आणि पुण्याची विशेष ओळख आहे. विद्वत्ता माणसाला चिरंचिव अमरत्व प्राप्त करुन देते. पुणे विद्वत्तेचे शहर. इथे सन्मानित होणे यापेक्षा मोठा आनंद आणि अभिमान नाही.
लोकमान्य व लोकशाहिरांना अभिवादन
लोकमान्य टिळक हे स्वातंत्र्य संग्रामाच्या माथ्याचे तिलक आहेत. तर, लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांचे समाज सुधारणेमधील योगदान मोठे आहे. या दोघांनाही नमन करीत असल्याचे मोदी म्हणाले.
गुजरात-लोकमान्यांचे उलगडले नाते
गुजरात आणि लोकमान्यांचे नाते आहे. ब्रिटीशांच्या अत्याचाराची पर्वा न करता अमदाबादमध्ये त्यांच्या स्वागतासाठी 40 हजार लोक जमा झाले होते. सरदार वल्लभभाई पटेलांनी नगराध्यक्ष असताना टिळकांचा पुतळा व्हिक्टोरिया गार्डनमध्ये बसविण्याचा निर्णय विरोध पत्करुन घेतला. या पुतळ्याचे महात्मा गांधी यांच्या हस्ते १९२९ साली उद्घाटन करण्यात आल्याची आठवण त्यांनी सांगितली.
जनतेचा स्वत:वर विश्वास
मागील नऊ वर्षात देशातील जनतेने परिवर्तन घडविले आहे. देशातील जनतेचा स्वत:वर विश्वास आहे. त्यामुळेच कोविड काळात वैज्ञानिकांवर विश्वास दाखविला. आपण स्वयंपूर्ण लस बनविली. विना जामीनदार मुद्रा कर्ज, स्वत:च्या स्वाक्षरीवर अटेस्टेड ही सर्व प्रामाणिकपणावर विश्वास ठेवण्याचीच कामे आहेत. देशात सकारात्मक वातावरण आहे. विश्वासाने भारलेले लोक विकासात योगदान देत आहेत. स्वच्छ भारत, बेटी बचाव, बेटी पढाव, गॅस सबसिडी याला जनतेने उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचे मोदी म्हणाले.