गंगाराम मारवाडी आणि अनंत कान्हेरे यांची अतूट मैत्री. देशासाठी आणि देशप्रेमी मित्रासाठी फासावर जाण्यासाठीही तयार असणार्या गंगाराम रुपचंद श्रॉफ तथा गंगाराम मारवाडी यांच्या त्यागाची आणि देशप्रेमाची कथा या लेखात मांडली आहे.
एका दोस्तीची सच्ची कहाणी. गंगाराम मारवाडी आणि अनंत कान्हेरे. गंगारामने तर आपल्या पत्रात अनंताला लिहिले होते की, ”मी पूर्वजन्मी तुझी माता आणि तू माझा सूत होतास. तेच प्रेम याही जन्मी मिळाले हे केवढे भाग्य”. अनंत कान्हेरे शिक्षणासाठी औरंगाबादला आले. यावेळी ते गंगाराम श्रॉफ यांच्या घरात वरच्या मजल्यावर भाड्याने खोली घेऊन राहू लागले आणि इथून सुरू झाली गंगाराम आणि कान्हेरे यांच्या प्रगाढ मैत्रीला सुरुवात. ही मैत्री इतकी झाली की कान्हेरेंच्या पालकपत्रावर गंगारामचे मोठे बंधू उत्तमचंद स्वाक्षरी करत असत.
त्यांच्या अनेक विषयांवर चर्चा होत असत. त्यातला महत्त्वाचा विषय म्हणजे भारतमातेचे पारतंत्र्य. दोघांचेही वाढते वय होते, रक्त सळसळत होते. आपल्या आसपास काय घडते आहे याची त्यांना जाण होती. अनंत कान्हेरेंची गणू वैद्यशी ओळख गंगाराममुळेच झाली. नाशिकला बाबाराव सावरकरांचे कार्य, त्यांची तळमळ, तिथे घडणार्या सगळ्या घटना गणूमुळे दोघांनाही कळत होत्या. प्रत्येक घडणार्या घटनेबरोबर अनंत कान्हेरे आपल्या हाताने देशसेवा व्हावी,यासाठी उद्युक्त होत होते. नाशिकच्या क्रांतिकारक संघटनेचे अर्थात ‘मित्रमेळ्या’ची कठीण शपथ अनंत कान्हेरेंनी घेतली. नाशिकला जॅक्सन वधाचा प्लॅन ठरला.
त्यावेळी कामाची पद्धतच एकूण अशी होती की, एखादी घटना घडताना त्याबद्दलची वाच्यता कुठेही होणार नाही, ही सगळ्यात पहिली खबरदारी घेतली जायची आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जर पकडले गेलेच तर कुणाचेही नाव घायचे नाही. अनंत कान्हेरे पकडले गेले, तेव्हा त्यांनी कोणाचेच नाव घेतले नाही. सगळ्या घटनेच्या मागे सूत्रधार फक्त आणि फक्त मी हे त्यांनी ठामपणे सांगितले. मग गंगाराम कसे अडकले, तर याला कारणीभूत ठरले त्यांनी अनंत कान्हेरे यांना लिहिलेले पत्र. खरंतर हे पत्र कान्हेरेंनी वाचून फाडून टाकले होते. पण, जेव्हा त्यांच्या सामानाची/घराची झडती घेण्यात आली, त्यावेळी त्यांना एक चिटोर्यावर गीतेचा श्लोक लिहिलेला सापडला. अक्षर जुळवणी झाली आणि ते अक्षर गंगाराम मारवाडी यांचे आहे हे निश्चित झाले. गंगाराम यांच्यावर इंग्रजी सरकारी पाश आवळले गेले.
जो व्यक्ती जॅक्सन वधात, कान्हेरे यांच्याशी दुरांव्ये संबंध आढळला तरी तो इंग्रजांच्या वक्रदृष्टीला पात्र होत असे. त्याला पकडून सरकारवाडा पोलीस ठाण्यावर आणले जात असे आणि मग सुरू होत असे चौकशीच्या नावावर अनन्वित शारीरिक छळ आणि मानसिक अवहेलना.ज्यावेळी गंगाराम मारवाडी यांना सरकरवाड्यात आणले गेले, त्यावेळी असेच घडले. नरकयातना कशाला म्हणतातहे त्या सगळ्या देशभक्तांनी जीवंतपणे भोगला. गंगाराम याच्या मलद्वारात तिखट टाकण्यात आले. आज हे शब्द लिहितानासुद्धा आत्मा कापत आहे. या अनन्वित छळानंतर त्यांच्याकडून ते पत्र परत लिहून घेण्यात आले आणि पुढे हाच पुरावा त्यांच्याविरूद्ध वापरला गेला. ते पत्र म्हणजे देशभक्तांसाठी गीता म्हटली पाहिजे. हे पत्र म्हणजे दुसरे तिसरे काही नसून एका देशभक्ताने दुसर्या देशभक्ताला केलेले आवाहन होते. हे पत्र म्हणजे एका मातृभूमीच्या पोराचे दुसर्या मातृभूमीच्या पोराजवळ व्यक्त केलेली कळकळ.
पहिले ज्ञान आणि कला पुढे पारतंत्र्य शृंखला
त्या नवे तोडू तडतडा हाची हे तू परस्परा॥
ज्यावेळी जॅक्सन वधाचा खटला चालवला गेला, त्यावेळी गंगाराम यांनी प्रश्नांचे उत्तर देणे नाकारले. त्याची एक विनंती होती की, त्याला न्यायालया पुढे अनंताचे गुणवर्णन करायचे आहे. अर्थात न्यायालय ते मानणार नव्हतेच. त्यामुळे पराकोटीच्या नरक यातना भोगल्यावर त्यांना सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली. गंगाराम त्याहीवेळी न्यायालयात म्हणाले की, अनंतला फाशी होणार, मलाही जीवंत राहायची इच्छा नाहीये. मला कारावास किंवा काळ्या पाण्याची शिक्षा नको, मलाही माझ्या मित्राबरोबर फासावर चढवा. मैत्रीचा दिवस साजरा करायचा असेल, तर तो हा असावा, जेव्हा एका मित्राने दुसर्या मित्रासाठी अशाप्रकारे जीवाला जीव लावला आणि जीवाला जीव दिला.
सोनाली तेलंग
९८८११३२३९३