हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू

09 Jul 2023 19:43:47
Haivy Rainfall In Himachal Pradesh

मुंबई
: हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले असून २४ तासांत आतापर्यंत ३ जणांचा मृत्यु झाला आहे. दरम्यान, मंडी ते मनाली महामार्ग विविध ठिकाणी दरड कोसळल्याने बंद करण्यात आला आहे. तसेच, एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, काही भागात मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून एनडीआरएफने रेस्क्यूदेखील केले. दरम्यान, उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पावसामुळे परिस्थिती चिंताजनक असून दिल्ली, हरियाणा , जम्मू आणि काश्मीर ही राज्येदेखील मुसळधार पावसामुळे प्रभावित झाली आहेत.

हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे अक्षरशः जनजीवन विस्कळीत झाले. राज्यातील ३ महामार्ग यामुळे बंद ठेवण्यात आले. तसेच, या पावसाचा फटका रेल्वे वाहतूकीवरही दिसून आला असून सोलनमध्ये कालका- शिमला ट्रॅकवर रेल्वेची वाहतूक थांबविण्यात आली. त्याचप्रमाणे, वीजप्रवाह खंडित झाल्यामुळे जीवनचक्र थांबले आहे. काही भागात दरडी कोसळणे, भूस्खलनसारख्या घटनांमुळे येथील परिस्थिती चिंताजनक आहे.
 
दरम्यान, एनडीआरएफने हिमालयातील संततधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील चारुडू गावात व्यास नदीचे पाणी वाहून आल्याने तेथील स्थानिक पाच जणांना बुडालेल्या घरातून वाचवले आहे. तसेच, मंडी जिल्ह्यातील पंडोह येथे मुसळधार पावसामुळे व्यास नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पाण्याखाली गेलेल्या घरांमधून सहा जणांची सुटका करण्यात आली. दरम्यान, उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये दिल्ली, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


 
Powered By Sangraha 9.0