‘मी पुन्हा येईन’ वेब मालिका प्रकाशझोतात

08 Jul 2023 17:51:06

me punha yein


मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सामान्य माणसालाच्या आकलनापलिकडे गेले आहे. अशास्थितीत एकीकडे मतदारांच्या मताला खरेच किंमत आहे का? अशा प्रश्न उपस्थित केला जात असताना दुसरीकडे या वातावरणात कानांवर पुन्हा येईन असे शब्द ऐकू येत आहेत. साधारण एक वर्षांपूर्वी प्लॅनेट मराठीवर ‘मी पुन्हा येईन’ ही वेब मालिका प्रदर्शित झाली होती. महाराष्ट्राच्या राजकारणातील अभूतपूर्व सत्तानाट्य दाखवणाऱ्या या मालिकेला प्रेक्षकांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. यातील संवादही भरपूर गाजले होते. राजकारणातील सत्यस्थिती, डावपेच, सत्तापालट, रिसॅार्ट पॅालिटिक्स, नेत्यांची, आमदारांची पळवापळवी, पक्ष बदल या सगळ्या गोष्टी यात दाखवल्या होत्या आणि त्या सध्याच्या परिस्थितीशी तंतोतंत जुळत देखील होत्या. आता ही वेबसीरिज पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे आणि निमित्त आहे सध्या सुरू असलेले राजकारण.

महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीवर आधारित विनोद, मिम्स सर्वत्र झळकत असतानाच या मालिकेमधील काही व्हिडीओज, डायलॅाग्जचे मिम्सही सध्या समाजमाध्यमावर धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे लोकांना पुन्हा एकदा ही वेब मालिका पाहण्याची उत्सुकता लागली आहे. ही मालिका सध्य स्थितीशी कशी साधर्म्य साधणारी आहे, यातील प्रत्येक कलाकार आपल्याला कोणाची ओळख करून देतो याबद्दलचे अनेक मिम्स सध्या सर्वत्र शेअर होत आहेत. परिणामी, तापलेल्या राजकीय वातावरणात प्रेक्षकांचे मनोरंजनही होत आहे. या वेब मालिकेमध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, भारत गणेशपुरे, रूचिता जाधव, सिद्धार्थ जाधव यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Powered By Sangraha 9.0