‘बाईपणा’ची सप्तरंगी गोष्ट!

    08-Jul-2023
Total Views |
Interview Of baipan bhari deva Marathi Film Cast

घराला, माणसांना प्रत्येक नातेसंबंधांना बांधून ठेवणारी व्यक्ती म्हणजे स्त्री. मात्र, पिढ्यान्पिढ्या ‘रांधा वाढा उष्टी काढा’ या म्हणीप्रमाणे बाईचे जगणे, हे आजही २१व्या शतकात फार बदलले आहे, असे नाही. पूर्वीच्या काळी बाईला आर्थिक स्थैर्य नव्हते आणि त्यामुळेच बाईचे भारीपण तिला प्रत्येक क्षणी सोसावे लागत होते. मात्र, आधुनिकतेच्या जगात हा सोशिकपणा स्त्रियांच्या आर्थिक स्तब्धतेला कमी करत गेला आणि जबाबदार्‍यांचे ओझे वाढवत गेला. हेच जबाबदारीचे ओझे पाठीवर घेऊन स्वत:साठी जगणे विसरुन गेलेल्या सहा बहिणींची कथा दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातून मांडली आहे.

मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीचा एक काळ आपल्या अभिनय, लेखनकौशल्याने गाजवलेल्या सहा अभिनेत्रींनी ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे, या चित्रपटाने बर्‍याच काळानंतर मराठी चित्रपटसृष्टीला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवून दिले असून, अवघ्या सात दिवसांमध्ये या चित्रपटाने १२.५० कोटींची यशस्वी कमाई केली आहे.
 
खरं तर दोन स्त्रिया एकत्र आल्या की भांडणं होणारचं, असा एक प्रचलित समज. याच समजाची सोबत घेत ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या लेखिका वैशाली नाईक यांनी सहा बहिणींच्या मतभेदांमागील कारणे आणि त्यातही त्यांचे एकमेकींवर असणारे अतोनात प्रेम, या कथानकातून नातेबंधांच्या ऋणानुबंधात अगदी अलगद गुंफले आहे. चित्रपटाच्या कथेची गरज जाणून घेत प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी कलाकारांची योग्य निवड करण्यात आली आहे. वयाची चाळीशी पार केलेल्या सहा अभिनेत्रींची निवड ही वाखाण्याजोगीच. जसे वय वाढत जाते तसे स्त्रियांच्या मानसिक, शारीरिक बदलांवरही दिग्दर्शकाने प्रकाश टाकला आहे. तरुणाईपासून सुरू झालेला तिचा प्रवास बाईपणाकडे येत जातो. बाईपण आलं म्हणजे काय, तर लग्न-संसार सुरू झाल्यानंतरची खरी धावपळ म्हणजे ‘बाईपण‘ आणि हीच तारेवरची कसरत प्रत्येक वयोगटातील स्त्री कशी करत असते, याचे प्रतिनिधित्व खर्‍या अर्थाने रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि दीपा परब-चौधरी या सहा अभिनेत्रींनी उत्तमपणे आपापल्या भूमिकांतून साकारले आहे.

मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची मोहोर उमटवणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी ‘गांधी’, ‘चालबाज’, ‘अग्निपथ’, ‘सरकार’ अशा गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्येही आपली छाप उमटवली आहे. या चित्रपटात रोहिणी यांनी माईची भूमिका साकारली आहे. कमी बोलणारी, मात्र आपल्या बहिणींसाठी मोठी बहीण म्हणून त्यांच्या पाठीशी सदैव उभी राहणारी माई, प्रत्येक स्त्रीला आपल्या मोठ्या बहिणीची आठवण नक्कीच करून देते. यानंतर येते वंदना गुप्ते यांनी साकारलेली शशीची भूमिका. वैयक्तिक जीवनातही प्रत्येकाला बांधून ठेवण्याचा स्थायी स्वभाव असणार्‍या वंदना गुप्ते यांनी ‘मंगळागौर‘ या त्यांच्या लहानपणीच्या खेळाला मोठेपणी स्पर्धेच्या रुपात बहिणींना जोडणारा दुवा निर्माण केला.

मात्र, शशी आणि माई या जुळ्या बहिणींच्या नात्यातील दुरावा काहीही न बोलता केवळ स्पर्शातून कसा दूर होतो, ते चित्रपट पाहताना हळुवार उलगडत जाते, तर सुचित्रा बांदेकर आणि शिल्पा नवलकर यांनी साकारलेल्या केतकी आणि पल्लवी या व्यक्तिरेखादेखील खूप काही शिकवून जातात. बहिणी म्हटलं की, कोण जास्त सुंदर दिसतं? असा प्रश्न उपस्थित केला जातोच आणि या प्रश्नातूनच केतकी आणि पल्लवीमध्ये झालेले वादविवाद अत्यंत खरे भासतात, तर दुसरीकडे सुकन्या मोने आणि दीपा परब यांनी साधना आणि चारू या संसारात अत्यंत व्यस्त असणार्‍या, परंतु नोकरीसाठीही तितक्याच खस्ता खाणार्‍या बाईचे जीवन कसे असते, याचे उत्तम सादरीकरण केले आहे.

केदार शिंदे यांनी १९ वर्षांपूर्वी ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांनी पुरुषांना बाईच्या मनातील ऐकू येत असल्याचे कथानक चांगलेच गाजले होते. मात्र, ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातून बाईलाच तिच्या मनातील गोष्टी ऐकण्याची आणि स्वत:ची स्वप्न पूर्ण करण्याची, जगण्याची किती गरज आहे, हे शिंदेंनी दाखवून दिले. चित्रपट पाहताना कुठेही प्रेक्षकांना कंटाळा येणार नाही, याची खबरदारी दिग्दर्शक आणि लेखकाने अगदी पुरेपूर घेतलेली जाणवते. चित्रपटाचे शीर्षक वाचल्यावरच पुन्हा एकदा स्त्रियांच्या प्रश्नांवर किंवा अडचणींवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे का, असा प्रश्न उद्भवतो.

मात्र, केवळ सहा बहिणींची कथा सांगणारा हा चित्रपट निव्वळ बहिणींमधील दुरावे, रुसवे-फुगवे आणि शेवटी एकमेकींवर असणार्‍या प्रेमामुळे एकत्र येणार्‍या बहिणींचा रंगीत प्रवास दाखवण्यात दिग्दर्शक नक्कीच यशस्वी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, दिग्दर्शकांनी चित्रपटातील सहा प्रमुख पात्रांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या सहा पात्रांना सहकार्य करणार्‍या व्यक्तिरेखाही त्यांनी ताकदीने नक्कीच उभारलेल्या दिसून येतात. मात्र, कुठेही या सहा प्रमुख भूमिका सहकलाकारांच्या माग झाकोळलेल्या दिसत नाही. याशिवाय चित्रपटाचे संवाद, वेशभूषा, चित्रीकरणाची ठिकाणे ही देखील तितकीच वास्तवदर्शी वाटतात.

चित्रपटातील व्यक्तिरेखांइतकेच संगीतही तितकेच प्रभावी. १९ वर्षांपूर्वी ’अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटातून केदार शिंदे यांनी दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवली. त्या चित्रपटाचे संगीतकार साई-पीयूष या जोडीनेच या चित्रपटासाठीही अप्रतिम संगीतरचना केली आहे. ‘बाईपण भारी देवा’ या गाण्याचे संगीतच मुळात ठसकेबाज असल्यामुळे बाईपणाचा ठसका गाण्यातूनही अनुभवता येतो. याशिवाय ‘मंगळागौर‘ हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ अतिशय सुंदरपणे दिग्दर्शकाने आजच्या पिढीसमोर मांडला आहे. सहा काकडे बहिणी लहानपणापासूनच मंगळागौरीचा खेळ खेळत असतात आणि आता चाळीशी पार केल्यानंतर मंगळागौर खेळाच्या स्पर्धेत भाग घेत आजच्या तरुण पिढीलाही आपली संस्कृती, आपले पारंपरिक खेळ काय आहेत, हे या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.

गेला काही काळ हा मराठी चित्रपट किंवा नाटकांसाठी चांगला नव्हता, अशी टीका करणार्‍यांची तोंडं ‘चारचौघी’, ‘झिम्मा’ यांसारख्या नाटक आणि चित्रपटाच्या घवघवीत यशाने बंद केली. महिलांना केंद्रस्थानी ठेवून निर्मित आणि दिग्दर्शित केले जाणारे चित्रपट मराठी प्रेक्षकांना अधिक भावतात, हेच यावरुन दिसून येते. याचा प्रत्ययही ’बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकर्षाने जाणवला. रसिक प्रेक्षकांसाठी उत्तम मनोरंजन आणि अभिनयाची पर्वणी या चित्रपटात आहे, यात दुमत नाही. सध्याच्या धावपळीत हळुवार समजून-उमजून देत बाईची गोष्ट रंजक शैलीत मनात उतरवण्याचा एक ‘भारी‘ प्रयत्न आहे.

अशा या सहा बहिणींच्या सहा वेगवेगळ्या तर्‍हा विविध रंगांनी चित्रपटात रंगलेल्या पाहायला मिळतात. याशिवाय अभिनयाच्या या सहा छटांमध्ये कसदार लेखनाच्या सातव्या रंगाचे मिश्रण करत, आजच्या जगाला आणि पुरुषांना बाईचं भारीपण दाखवून देण्याचे लेखिका वैशाली नाईक यांनी केलेले काम वाखाणण्याजोगेच.

‘बाईपण भारी देवा‘ हा चित्रपट जरी स्त्रीकेंद्रित असला, तरी तो पुरुषांनीही आवर्जून पाहावा असाच. त्याचे कारण असे की, तुमच्या घरातील आई, बहीण, बायको तिच्या वाढत्या वयामागे तिची स्वप्न दुर्लक्षित करत असते आणि हे पुरुषांना त्यांचे स्वत:चे जीवन जगताना बरेचदा जाणवत नाही. सकाळपासून ते रात्रीपर्यंत केवळ आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी जगणार्‍या स्त्रिला तिचा असाही एक छंद असतो आणि तो जोपासण्यातही तिला आनंद वाटतो, हे ती विसरून जाते. मात्र, हा चित्रपट पाहिल्यानंतर पुरुषांनाही आवर्जून तुमच्या घरातील स्त्रिचे ‘बाईपण‘ किती ‘भारी‘ आहे आणि त्यामुळेच तुमचे जीवन किती सुरळीत सुरू आहे, याची जाणीव होईल, असे म्हणायला हरकत नाही.

चित्रपटाचे नाव : बाईपण भारी देवा
दिग्दर्शक : केदार शिंदे
निर्माते : जिओ स्टुडिओज, माधुरी भोसले
सह-निर्माते : बेला शिंदे आणि अजित भुरे
कलाकार : रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दीपा परब-चौधरी
लेखिका : वैशाली नाईक
संगीत : साई-पीयूष

रसिका शिंदे-पॉल