प्रवासात वाचन पेरणारे प्रशांत

07 Jul 2023 22:12:14
Article On Rickshaw Driver Prashant Prakash Kamble

बारावीमध्ये तीनदा अपयशी ठरल्यानंतरही ते खचले नाही. नव्या उमेदीने उभे राहत ते रंगभूमीच्या सेवेसह रिक्षाचालक म्हणून हजारो लोकांना वाचनाचे महत्त्व पटवून देत आहेत. जाणून घेऊया प्रशांत प्रकाश कांबळे यांच्याविषयी.

लातूर जिल्ह्यातील बोळेगाव येथे जन्मलेल्या प्रशांत प्रकाश कांबळे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. वडील मजुरी करत, तर आई गृहिणी. शाळेतील स्नेहसंमेलनात ते भाग घेत असत. बालपणापासून त्यांना गायन आणि नृत्याची विशेष आवड. इयत्ता दुसरीत असताना त्यांचे आईवडील कामाच्या शोधात पुण्यात गेले. इयत्ता पाचवीपर्यंत प्रशांत आजोबांकडे राहिले. पुढे ते आईवडिलांकडे गेले आणि सहावी ते आठवीपर्यंतचे शिक्षण पुण्यातच घेतले. त्यानंतर प्रशांत पुन्हा मामांकडे लातूरला आले. जिजामाता विद्यालयातून त्यांनी नववी आणि दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. २००३ साली चांगल्या गुणांनी प्रशांत इयत्ता दहावी उत्तीर्ण झाले.

पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुन्हा पुणे गाठले. कोणत्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, याची माहिती त्यांना नव्हती आणि जेव्हा थोडीफार मिळाली, तेव्हा अनेक महाविद्यालयांमधील प्रवेश संपले होते. अखेर वर्ष वाया जाऊ नये, म्हणून त्यांनी औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयामध्ये कला शाखेसाठी प्रवेश घेतला. यादरम्यान त्यांनी क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन आणि नाटकांमध्ये भाग घेतला. इयत्ता बारावीमध्ये प्रशांत अनुत्तीर्ण झाले. आईने पुन्हा परीक्षा देण्यास सांगितले. पुन्हा परीक्षा दिल्यानंतरही प्रशांत पुन्हा अनुत्तीर्ण झाले. त्यानंतर पुन्हा एकदा परीक्षा देऊनही त्यांना अपयश आले. त्यानंतर सात ते आठ महिने प्रशांत यांनी घरी थांबणेच पसंत केले. नंतर त्यांनी नोकरीसाठी चाचपणी सुरू केली. अखेर डिसेंबर २००७ मध्ये त्यांना एका कंपनीत नोकरी लागली. सुरुवातीला २ हजार, ३०० पगार मिळत असे. एकदा स्टुडिओतून फोन आला आणि त्यांनी १५ दिवस पथनाट्याचे काम करण्याविषयी विचारणा करण्यात आली.

पण, कंपनीने दोन दिवसांहून अधिक सुट्टी मिळणार नाही, असे सांगितले. त्यामुळे द्विधा मनस्थितीत सापडलेल्या प्रशांत यांनी आपली आवड जोपासण्यासाठी नोकरी सोडली. पथनाट्याचे काम केल्यानंतर त्यांनी पुन्हा दुसर्‍या कंपनीत नोकरी सुरू केली. तिथेही आरोग्यविषयक समस्येमुळे नऊ महिन्यांत नोकरी सोडली. नाट्य क्षेत्राची आवड जोपासण्यासाठी वेळप्रसंगी त्यांनी नोकरी सोडणेही पसंत केले. पुढे त्यांनी नाट्यक्षेत्रातील संबंधित लोकांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे त्यांना कामे मिळण्यास सुरुवात झाली. प्रथमतः त्यांना नाटकात नेपथ्याची कामे मिळू लागली. त्यातून ओळखी निर्माण झाल्या. सुरुवातीला महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित ‘आसूड’ या नाटकात त्यांनी महात्मा फुले यांचे सहकारी शिवराम कांबळे आणि दरोडेखोर अशा दोन भूमिका साकारल्या. पुढे त्यांनी अतुल पेठे यांच्या ‘सत्यशोधक महात्मा,’ ‘समाजस्वास्थ्य’ या नाटकांमध्ये भूमिका केल्या. ‘आषाढातील एक दिवस’ या नाटकात नेपथ्याचे काम त्यांनी सांभाळले.

नाटकात काम करत असताना प्रशांत नेपथ्याचेही काम करत असे आणि त्यातून त्यांना बर्‍यापैकी अर्थार्जन होत असे. कोरोना काळाच्या आठ महिन्यांआधी प्रशांत यांच्या भावाने रिक्षा घेतली. कोरोना काळात कलाक्षेत्रही ठप्प होते. त्यामुळे प्रशांत यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. नाटक क्षेत्रात काम करत असल्याने प्रशांत यांना वाचनाची प्रचंड आवड होती. दररोज सकाळी रिक्षा चालवण्यासाठी घरातून निघताना ते एक पुस्तक घेऊन जात असे आणि दिवसभरात वेळ मिळेल, तसे ते वाचून काढत. रिक्षात बसणार्‍या प्रवाशांसाठीही पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्यातच त्यांना ‘ओपन लायब्ररी मुव्हमेंट’ यांचे सहकार्य मिळाले आणि कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त दि. २८ फेब्रुवारी २०२१ साली या संकल्पनेचा शुभारंभ झाला. ‘कुसुमाग्रज फिरते वाचनालया’च्या माध्यमातून प्रशांत यांनी वाचकांची चळवळ उभी करण्याचा ध्यास घेतला आहे.

सध्या या फिरत्या वाचनालयात मराठीची कथा, कादंबरी, कविता अशी ५० ते ६० पुस्तके आहेत. अनेकजण या वाचनालयाला पुस्तक दानदेखील करतात. आतापर्यंत या मोफत वाचनालयाचा हजारो लोकांनी लाभ घेतला आहे. अतुल पेठे यांना प्रशांत गुरुस्थानी मानतात. भविष्यात नाट्यक्षेत्रात काम करत राहण्याची प्रशांत यांची इच्छा आहे. सोबत रिक्षा व्यवसायही आहेच. नाटक ही आवड आहे. परंतु, परिस्थिती आणि उदरनिर्वाहासाठी ते रिक्षा चालवतात.

मेट्रोची कामे, ट्रॅफिक, गर्दी यांमुळे १५ मिनिटांच्या प्रवासासाठी दुप्पट वेळ लागतो. त्यामुळे त्या वेळेत प्रवासी पुस्तक वाचतो. म्हणजेच तो वेळ वाया जात नाही. मराठी भाषा, मराठी साहित्य टिकावे, याकरिता हा माझा खारीचा वाटा आहे. मला तर शिकता आले नाही. परंतु, दुसर्‍यांना वाचनासाठी मी प्रोत्साहित करतोय याचा आनंद असल्याचे प्रशांत सांगतात. तीन वेळा इयत्ता बारावीत अनुत्तीर्ण होऊनही त्यांनी हार मानली नाही. उलट आतापर्यंत हजारो लोकांना वाचनासाठी प्रोत्साहित केले. नाट्य क्षेत्रात काम करण्याबरोबरच उदरनिर्वाहासाठी ते रिक्षा चालवतात. परंतु, त्यातूनही ते समाजप्रबोधन आणि वाचनाचे महत्त्व लोकांना पटवून देण्याचे काम करत आहे. प्रशांत कांबळे यांना त्यांच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’च्यावतीने मनःपूर्वक शुभेच्छा.

(अधिक माहितीसाठी संपर्क ः ७०५८५८९७६७)

Powered By Sangraha 9.0