माझा बाप आणि मीच नेता!

06 Jul 2023 20:40:58
sharad pawar politics crisis


बापाने सत्ता गाजवली. अर्थात, त्यांच्या सत्तेत झिजणार्‍या कार्यकर्त्यांचा वाटा मोठाच होता. तारुण्य म्हणू नका, संसार म्हणू नका, भवितव्य म्हणून नका, सगळे पक्षसंघटनेसाठी उधळून लावतात. त्याचवेळी नेत्यांची मुलं ऐषोरामात जगत असतात. पुढे वृद्ध झालेल्या नेत्याला पक्षासाठी नव नेतृत्व उभे करायचे असते. नेत्याला नव्या नेतृत्वासाठी त्याचे वंशजच लायक वाटतात. हेच वंशज मग पक्षात आल्या-आल्या मंत्री किंवा आमदार, खासदार, गेला बाजार नगरसेवक होतात. हेच वंशज तीन पिढ्या खपलेल्या कार्यकर्त्यांला संघटन, निष्ठा, त्याग सांगत राहातात. बापाच्या कृपेने त्यांना आयती सत्ता मिळालेली असते. त्यामुळे आपल्या बापाशिवाय दुसरे कुणी श्रेष्ठ असूच शकत नाही, असे हे भासवत असतात. मग जळी-स्थळी-काष्टी-पाषाणी हे लोक ‘माझा बाप, माझा बाप’ करत राहातात.‘सांगे वडिलांची कीर्ती। तो येक मूर्ख॥’ समर्थ रामदास स्वामी म्हणून गेलेत. याबाबत उद्धव ठाकरे यांचा हात धरणारे कालपर्यंत कुणी नव्हते. मात्र, आज त्यांच्यासमोर सुप्रिया सुळेंच्या रुपाने जबरदस्त स्पर्धक उभा ठाकला आहे.गेल्या वर्षी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी ज्याप्रकारे जशी विधाने केली, अगदी तशीच विधाने सुप्रिया सुळे सध्या करत आहेत. या पार्श्वभूमीवर आठवते की, शिवसेनाप्रमुख सैनिकांना म्हणाले होते की, “माझ्या उद्धवला सांभाळा.” पण, सुप्रियाच्या वडिलांना हेसुद्धा शक्य नाही. कारण, त्यांची विश्वासार्हता सगळ्यांना आणि त्यांची त्यांना माहिती आहे. त्यामुळे आपल्या मुशीत घडलेले पदाधिकारी-नेते यांच्या विश्वासार्हतेवर विश्वास ठेवून सुप्रियांचे भवितव्य घडेल का, यावर पवारांचा विश्वास असेल, यावरच कुणी विश्वास ठेवणार नाही. असो सुप्रिया सुळेंनी विधान केले की, “बाप आजारी पडल्यावर त्याला दवाखान्यात कोण नेते, तर लेकच.” पण, सुप्रिया आणि देशातल्या इतर लेकींमध्ये फरक आहे. अगदी मजुराची लेक, शेतकर्‍याची लेकही वय झालेल्या बापाला हेच म्हणेल बापा खूप केलस, आता थोडा आराम कर, मी आहे ना? याउलट या वयातही शरद पवार यांना सुप्रियाचे राजकीय बस्तान बसवण्यासाठी नामुश्की सहन करावी लागत आहे. बापाचे पुराण केवळ सत्ताप्राप्तीसाठी गाणार्‍या या लोकांना हे सगळे पाहून वाटते, बस करा रे, माझा बाप आणि मीच नेता हे पुराण!


अजून काय काय आठवेल?


काही लोक राज्यातील नव्या राजकीय समीकरणांबद्दल बोलू लागले आहेत. अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, तर भाजपने त्यांना सत्तेत का घेतले, असे म्हणत हे लोक टाहो फोडत आहेत. साधनशुचिता, नीतिमत्ता यावर काही जण तर खंडकाव्य लिहावे, तसे भाराभर लिहीतही सुटले. भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीचा मोठा गट आल्याने भाजप सत्तेची ताकद वाढली, हे पाहून काहींवर तर आकाश कोसळले. खरेच का या सगळ्यांना लोकशाही, नीतिमत्ता वगैरेचे काही पडले आहे? मग महाविकास आघाडीची सत्ता असताना डोळे मिटून आणि मूग गिळून हे लोक का गप्प बसले होते? एकमेकांशी हाडवैर असलेले जुनी शिवसेना आणि राष्ट्रवादी तसेच काँग्रेस या तीनही पक्षांनी सत्ता बळकावली. तेव्हा, कोणती नैतिकता जपली होती? पण, आता रडणारी सगळी मंडळी त्यावेळी खुशीत होती. या तिघाडी सरकारच्या काळात अडीच वर्षे महाराष्ट्रात काय काय घडले, याचा काळा इतिहास महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य होते की ‘काय द्याल चे राज्य’ होते, याबद्दल न बोललेले बरे!पण, आता अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर पाप, पुण्य, नीती वगैरेच्या गप्पा मारणारे त्यावेळी थंड होते. ही काही मंडळी असं का वागत होती आणि आहेत? सामान्य लोकांचे म्हणणे आहे की, या लोकांना २०२४ साली पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी नको आहेत. कारण, ते स्वतःही खात नाहीत आणि दुसर्‍यांनाही खाऊ देत नाहीत. त्यामुळे राजकीय निवडणुकांमध्ये भाजपची सरशी होईल, अशी कोणतीही घटना घडली की, त्यांच्यावर आकाश कोसळते. बरं यांना आपण काय बोलतो याचेही भान नसते. पक्ष संघटन आणि सत्तेसाठी शरद पवार यांनी काही केले की, ही मंडळी म्हणणार तो जाणत्या राजाचा मुत्सद्दीपणा, मात्र दुसर्‍या कुणी तसे केले, तर मग षड्यंत्र! गेले अनेक दशके हीच मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात शरद पवार हे ‘जाणते राजे’ आहेत, असा भ्रम पसरवण्याचे काम इमानेइतबारे करत होते. पण, आता इतक्या वर्षांनी त्यांनी फुगवलेला भ्रमाचा फुगा फुटला. त्यामुळे हे लोक भयभीत, सैरभैर झाले. महाराष्ट्रात कसे वाईट-वाईट सुरू आहे, असे म्हणत आहेत. आयुष्यभर खोटे पसरवणार्‍या या लोकांना आता नीती-पापपुण्य आठवायला लागले. अजून काय-काय आठवेल देव जाणे.


 
Powered By Sangraha 9.0