सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरू! भाजप आमदारांनी दिली माहिती

05 Jul 2023 16:06:12
What Is Irrigation Scam In Maharashtra Inquiry Still On

पुणे
: "भाजपाने कोणताही पक्ष फोडलेला नसून अजित पवारांसोबत राष्ट्रवादी पक्ष सत्तेत सहभागी झालेला आहे", असे प्रतिपादन भाजपचे विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी केले. ते पिंपरी-चिंचवड पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापावेळी बोलत होते. दरम्यान, अजित पवारांनी घेतलेला निर्णय राज्यातील साडेबारा कोटी जनतेच्या हितासाठी घेतला असे सांगतानाच त्यांच्यावर आरोप असलेल्या सिंचन घोटाळ्याची चौकशी अद्याप सुरु असून त्यांना क्लीन चीट देण्यात आलेली नसल्याचे वक्तव्य आ. श्रीकांत भारतीय यांनी केले.

ते पुढे म्हणाले, भाजप-शिवसेना युती सरकारने राज्याच्या जनहिताची असंख्य कामे केली असून युतीच्या पारड्यात जनतेने मते टाकले असे म्हतानाच मात्र, जनतेच्या मताचा अनादर करीत सेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली, असेही त्यांनी सांगितले. तसेच, भाजप आणि शिवसेना या पक्षांनी एकत्र येत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे जनतेच्या मनातील सरकार स्थापन करताना त्यामागे सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार होता, असे ते म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामामुळे विरोधी पक्षातील मोठा गट प्रभावित झाला असून हा गट भाजप-सेनेच्या सरकारमध्ये सहभागी झाला आहे. त्यामुळे मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान व्हावेत असे त्यांना वाटत असेल तर हे भारतीय लोकशाहीसाठी पोषकच असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, पिंपरी-चिंचवड पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, राजेश पिल्ले उपस्थित होते.


Powered By Sangraha 9.0