मॅनहोल्सशी निगडित दुर्घटना टाळण्‍यासाठी बीएमसीकडून उपाययोजना

05 Jul 2023 19:14:06
Brihanmumbai Municipal Corporation Manhole Safety Net

मुंबई
: मुंबईतील पर्जन्य जल, मलनिसारण व इतर सेवांसाठी असलेल्या वाहिन्यांवरील प्रवेशमार्ग अर्थात मॅनहोल्सशी निगडित दुर्घटना टाळण्‍यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून या प्रवेशिकांमध्ये मजबूत अशा संरक्षक जाळ्या बसविण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची प्रतिकृती देखील तयार करण्यात आली आहे. या प्रतिकृतीनुसार मुंबईतील सर्व मॅनहोल्स मध्ये या जाळ्या टप्प्याटप्प्याने बसविण्यात येणार असून त्यादृष्टीने लवकरच कार्यवाही सुरु होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

महानगरपालिकेच्या यांत्रिकी आणि विद्युत विभागाने मॅनहोलसाठी संरक्षक जाळ्यांची स्‍वतंत्र प्रतिकृती विकसित केली आहे. संरक्षक जाळ्यांसाठी याआधी डक्टाईल धातूचा वापर करण्यात आला होता. आता नवीन प्रोटोटाईपमध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर करण्यात आला आहे. कारण स्टेलनेस स्टीलचा वापर केल्याने या मॅनहोलच्या संरक्षक जाळीचे आयुष्यमान वाढणार आहे. संरक्षक जाळ्यांचे ग्रीलचे डिझाईन आणि प्रत्यक्षात येणारा खर्चाचा अंदाज ठरविण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. लवकरच संरक्षक जाळ्यांच्या बाबतीत निविदा प्रक्रियेलाही सुरूवात होणे अपेक्षित आहे. तसेच, संपूर्ण पालिका क्षेत्रात टप्पेनिहाय पद्धतीने मॅनहोलवर जाळी बसविण्याची कार्यवाही यंदाच्या पावसाळ्यातच सुरु करुन पुढील पावसाळा सुरु होण्यापूर्वीच पूर्ण करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. माननीय उच्‍च न्‍यायालयाचे निर्देश लक्षात घेवून त्यानुसार सर्व मॅनहोल सुरक्षित करण्यात येतील.

मॅनहोलची झाकणे चोरीला जाण्यासारख्या प्रकारामुळे महानगरपालिका प्रशासनाकडून द्वितीय स्तरावर म्हणजे मॅनहोलच्या आतमध्ये संरक्षक जाळी लावण्याची मोहीम यापूर्वीच सुमारे १,९०० मॅनहोलच्या ठिकाणी राबविण्यात आली आहे. त्यासोबतच महानगरपालिकेकडून सर्व विभागांमध्ये विशेष मोहीम राबवून हरवलेल्या मॅनहोलच्या झाकणांची ठिकाणेही शोधण्यात आली आहेत. मॅनहोल्सची झाकणे चोरी होण्याच्या ठिकाणी सातत्याने पाहणी मोहीम राबवण्यात येत आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रोटोटाईपसाठी या सर्व १,९०० मॅनहोलच्या जाळ्यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार अधिक मजबूत आणि वाजवी अशा मॅनहोलच्या संरक्षक जाळ्या तयार करण्यासाठी विविध प्रयोग केले आहेत. त्यामध्ये कास्ट आयर्न, माइल्ड स्टील, स्टेलनेस स्टील अशा विविध पद्धतीच्या धातूंचा वापर करून या संरक्षक जाळ्या तयार करण्यात आल्या आहेत.

Powered By Sangraha 9.0