नवकेशकर्तनाने मस्तिष्क विकास चूडाकर्म संस्कार वैदिक षोडश संस्कार

    05-Jul-2023
Total Views |
Article On Vedic Shodasha Sanskar
 
दातांचा आणि डोक्याचा घनिष्ठ संबंध आहे. साधारणपणे एका वर्षांपर्यंत आठ, दीड वर्षांपर्यंत १२, दोन वर्षांपर्यंत अडीच ते तीन वर्षांपर्यंत २० दात येतात. हे दात येताना बाळाचे डोके जड पडते. कधी कधी ते तप्त होऊ लागते. त्यामुळे डोके दुखणे, हिरडे सुजणे, हगवण लागणे इत्यादी प्रकार सुरू होतात. मुले चिडचिड्या स्वभावाची बनू लागतात. थोडक्यात दातांचा मस्तिष्कावर परिणाम होऊ लागतो. याकरिता हे मस्तक हलके व थंड ठेवण्यासाठी डोक्यावरील केसांचे ओझे दूर करणे गरजेचे ठरते. म्हणूनच हा मुंडन संस्कार!
येनावपत् सविता क्षुरेण
सोमस्य राज्ञो वरुणस्य विद्वान्।
तेन ब्रह्माणो वपतेदमस्य गोमान् अश्ववानयमस्तु प्रजावान्॥ (अथर्ववेद-६/६८/३), (आश्वलायन गृहसूत्र- १/१७/१० (पारस्कर गृहसूत्र-२/१/११)
अन्वयार्थ

(येन क्षुरेण) ज्या प्रकारच्या वस्तर्‍याने (विद्वान) अभ्यासू व समजदार अशा (सविता) केस कापणार्‍या व ते स्वच्छ करणार्‍या नापिताने (सोमस्य) सौम्यगुणसंपन्न अशा (वरुणस्य) वरण करण्यायोग्य, निवडण्यायोग्य या (राज्ञ:) राजारुपी बाळाचे केस (अवपत्) कापले आहेत, त्याप्रमाणे त्याच विधीने (ब्रह्माण:) ज्ञानी लोकांनी (अस्य) या बालकाच्या (इदम्) अज्ञानरूपी केसांना (वपत) कापावे. (अयम्) हा बाळ (गोमान्, अश्ववान् , प्रजावान्) गाईंनी व घोड्यांनी परिपूर्ण आणि सुप्रजेने युक्त (अस्तु) होवो.

विवेचन

१६ संस्कारांच्या शृंखलेतील चूडाकर्म म्हणजेच मुंडन संस्कार हा आठवा संस्कार मानला जातो. बाळाच्या मस्तिष्कविकासाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा संस्कार! जावळ काढणे, केशवपन, क्षौरकर्म, चूडाकरण, चौलकर्म इत्यादी या नावांनीदेखील या संस्कारास ओळखले जाते. ‘चूडा’ या संस्कृत शब्दाचा शिखर किंवा अग्रभाग असा अर्थ होतो. आपल्या देहाचा शिरोभाग म्हणजेच अग्रणी चूडाभाग याचा संबंध डोक्यावरील केसांशी असल्याने या संस्काराला ‘चूडाकर्म’ किंवा ‘चूडाकरण’ असे म्हणतात. याच ‘चूडा’ शब्दापासून हिंदीतील ‘जूडा’ हा अपभ्रंश शब्द बनला आहे. डोक्यावर वाढलेल्या केसांमुळे याला ‘जटा’देखील म्हणतात.
बाळ आईच्या उदरात असल्यापासून आपल्या समवेत डोक्यावर केस घेऊन आलेला असतो. त्यांचे पूर्णत्वे कर्तन करणे आवश्यक ठरते. हा चूडाकर्म केव्हा करावा? या संदर्भात गृह्यसूत्रकारांत दोन मतप्रवाह आहेत. आश्वलायन ऋषी म्हणतात- ’तृतीये वर्षे चौलम्!’ म्हणजेच तिसर्‍या वर्षात हा संस्कार करावा, तर पारस्कर ऋषी म्हणतात - ’सांवत्सरिकस्य चूडाकरणम्!’ म्हणजेच बाळाला एक वर्ष पूर्ण झाले की त्याचे जावळ काढावे. म्हणून एक ते अडीच-तीन वर्षांपर्यंतच्या कालावधीत हा संस्कार करावा. यादरम्यान मुंडन करण्याचे कारण म्हणजे बाळाला येणारे दुधाचे दात.

दातांचा आणि डोक्याचा घनिष्ठ संबंध आहे. साधारणपणे एका वर्षांपर्यंत आठ, दीड वर्षांपर्यंत १२, दोन वर्षांपर्यंत अडीच ते तीन वर्षांपर्यंत २० दात येतात. हे दात येताना बाळाचे डोके जड पडते. कधी कधी ते तप्त होऊ लागते. त्यामुळे डोके दुखणे, हिरडे सुजणे, हगवण लागणे इत्यादी प्रकार सुरू होतात. मुले चिडचिड्या स्वभावाची बनू लागतात. थोडक्यात दातांचा मस्तिष्कावर परिणाम होऊ लागतो. याकरिता हे मस्तक हलके व थंड ठेवण्यासाठी डोक्यावरील केसांचे ओझे दूर करणे गरजेचे ठरते. म्हणूनच हा मुंडन संस्कार!

त्याचबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनदेखील या संस्काराचे महत्त्व आहे. बाळाच्या मस्तिष्काशी जवळचा संबंध येतो. मस्तिष्क म्हणजेच डोके हे शरीरातील सर्वांत महत्त्वाचे अवयव ते विस्तीर्ण मस्तिष्क व लघु मस्तिष्क या दोन भागात विभागले गेले आहे. बाळाच्या ज्ञानाचे व क्रियांचे महत्त्वपूर्ण केंद्र असल्याने यातूनच पाच ज्ञानेंद्रिये व पाच कर्मेंद्रिये यांचे संचालन होते, असे हे मस्तिष्क डोक्यावरील दोन कवटींच्या आत सुरक्षित असते. या दोन्ही कवट्या बाल्यावस्थेत व्यवस्थित जोडलेल्या नसतात. या जोडण्याच्या प्रक्रियेला ‘अस्थिसंधी’ असे म्हणतात. तीन वर्षांनंतर या कवटींची हाडे जोडू लागतात. म्हणूनच डोक्यावर केस काढण्याची ही वेळ असते. कारण, गर्भावस्थेतील केस हे आजपर्यंत कोमल कवटींचे रक्षण करत होते आणि त्या कवटीच मस्तिष्काचे रक्षण करीत होत्या. म्हणून कवटी जोडण्याकरिता ते जुने केस वस्तर्‍याने काढले जावेत. त्याचबरोबर हे जन्मजात केस मलीन होऊ लागतात. डोक्यामध्ये खरूज व इतर जखमा होऊन शकतात. डोके जड पडू लागते. तसेच, नवीन केस येणे सोपे जाते. याकरिता मुंडन संस्कार करणे आवश्यक आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनदेखील डोक्यावरील केस पूर्णपणे कापले जावेत. यामुळे उत्तम प्रकारचे आरोग्य लागते. यामुळे टाळूचे रक्षणदेखील होते. यासंदर्भात सुश्रुत ग्रंथात म्हटले आहे-
मस्तलुंग क्षयात् यस्य
वायु: ताल्वस्थि नामयेत् ।
तस्य तृड्दैन्ययुक्तस्य
सर्पि: मधुरकै: शृतम् ॥
अर्थात मस्तलुंग म्हणजे मस्तिष्काचे भाग क्षीण (दुर्बल) झाल्या कारणामुळे कुपित झालेला वायू हा टाळूच्या हाडांना खाली झुकवितो. म्हणजेच याला ‘टाळू पडणे’ असे म्हणतात. ज्या बाळाची टाळू पडते, त्याला खूप तहान लागते. चेहरा दीनहीन व म्लान होतो. मग असे बाळ दूध पिऊ शकत नाही. यास्तव त्याच्या टाळूवर जीवक इत्यादी मधुर गुणांनी युक्त अशा तुपाचा बोळा ठेवण्यात यावा.

याच सुश्रुतसंहितेतील चिकित्सास्थान (२४/७२) भागात म्हटले आहे-
पापोशमनं केशनखरोमापमार्जनम्।
हर्षं लाघवं सौभाग्यकरं उत्साहवर्धनम्॥
म्हणजेच केस, नख आणि रोम यांना नाहीसे केल्याने त्या व्यक्तीला हर्ष होतो. हलकेपणाची जाणीव होते आणि सुखाचा अनुभूती येते. तसेच, उत्साहदेखील वाढीला लागतो. मुंडन संस्काराचे वर्णन वेदांमध्येदेखील आढळते. अथर्ववेदात म्हटले आहे- ’दीर्घायुत्वाय...!’ म्हणजेच दीर्घ आयुष्याकरिता क्षौर कर्म केले पाहिजे. तसेच,’मान न आयु: प्रमोषी:!’ मुंडन केल्याने आमचे आयुष्य कधीही कमी होणार नाही, तर पारस्कर गृह्यसूत्रात दोन ठिकाणी यासंदर्भात म्हटले आहे-
तेन ते वपामि ब्रह्मणा
जीवातवे जीवनाय।
परमेश्वरासमवेत आपले जीवन घालविण्याकरिता मी तुझ्या डोक्याला स्वच्छ करतो. ‘तेन ते आयुषे वपामि।’ दीर्घ आयुष्याकरिता मी तुझे मुंडन करतो.
खरे तर केवळ बाळाचेच मुंडन केले जात नाही, तर विरक्त संतजन, वानप्रस्थी, संन्यासी व विद्वान मंडळीदेखील मुंडन करतात. त्यांची अनेक उदाहरणे आपल्या प्राचीन काळी सापडतात. उपनिषद साहित्यात याच नावावरून ‘मुंडकोपनिषद’ प्रसिद्ध आहे. या उपनिषदात म्हटले आहे- जो आपल्या डोक्यावरील केस पूर्णपणे नाहीसे करून शिरोव्रती बनतो, त्यालाच ब्रह्मविद्येचा उपदेश देण्यात यावा. ब्रह्मचर्य आश्रमात प्रवेश करतानादेखील त्या बटूचे मुंडन केले जाई.

प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य
९४२०३३०१७८