संगीत ते समाधी

05 Jul 2023 22:27:14
Article On Music To Samadhi

साधारणतः गीत हर्षाचा पर्याय मानले जाते. हर्ष झाल्यावर साधारण मानव गीत-नृत्यादी पर्यायांचा अवलंब करतो किंवा करवितो. असल्या मानवाला स्वतःच गीत-नृत्यादी करता आल्यास त्याच्या कुवतीप्रमाने किंवा कल्पनेप्रमाणे तो झालेल्या हर्षाला गीत-नृत्यादीतून वाट मोकळी करून देईल. स्वतःचे गीत वा नृत्य इतरांच्या तुलनेने निम्नस्तराचे आहे, असे मनावर झालेल्या पूर्व संस्काराने त्याला वाटल्यास तो इतरांना नृत्य-गीतादी करावयास लावून स्वतःच्या हर्षाला द्विगुणित करण्याचा प्रयत्न करील, सात्विक वृत्तीचा किंवा साधू वृत्तीचा माणूस हर्ष झाल्यास स्वतः नाचणार नाही, गाणार नाही किंवा इतरांकरवी तसे करवणार ही नाही. परंतु, हर्ष आनंदाचा भाव त्याच्या शरीराला अन्य प्रकारे चेतना दिल्याशिवाय राहणार नाही.

भाक्तिसूत्रात साधक भक्तांना भक्तीचा आविर्भाव झाल्यास त्यांच्यामध्ये अष्टसात्विक भाव उत्पन्न होतात, असे सांगितले आहे. ’स्तंभस्वेदोऽथ रोमांचः स्वरंभंगोऽथ वेपुथः। वैवर्ष्यमश्रुप्रलयः इत्यष्टौ सात्विका मताः॥‘ त्यामध्ये शरीराला कंप उत्पन्न होणे, रोमांच उभे राहणे, तालबद्ध नाचणे, चित्तात असलेला भाव व्यक्त करणारे इत्यादींचा अंतर्भाव त्या अष्टसात्विक भावात आहे. म्हणजे नाचणे, अंगविक्षेप करणे व गाणे या क्रिया अंत:करणातील भावनांना सहजपणे व्यक्त करणारे पर्याय होत. या दृष्टीने विचार केल्यास गीतनृत्यादी प्रकार, मानवाच्या अंतकरणातील भावांचे व्यक्त रुप होय असे म्हणावे लागेल, म्हणजे मानव हर्षानंद झाल्यासच नाचेल किंवा गाईल असे नसून, त्याला दुःख, विरह, क्रोध इत्यादी भाव उत्पन्न झाल्यास तो तेव्हाही नाचेल व गाईल, पण त्या त्या भावनांच्या वेळेस त्याचे गीत नृत्य त्या भावनेला योग्य असेच प्राकृतिक राहील.

क्रोध आल्यास मनुष्य विचित्र हातवारे करून आरडाओरडा करतो. शांत प्रकृतीच्या माणसाला क्रोध आल्यास तो साधारण संस्कारांच्या व्यक्तीसारख्या हातवारे करून आरडाओरड करणार नाही. याचे कारण त्याच्या चित्तावरील पूर्वजन्मीचे वा इहजन्मीचे संस्कारच होत, उच्च संस्कारविहीन कुटुंबातील व्यक्ती मरण पावल्यास कुटुंबातील विशेषतः स्त्रीवर्ग आक्रंदून रडत असतो. त्यात एक दृष्टोत्पत्तीस येईल की, त्यांच्या रडण्यातही एक प्रकारचे गीत चालू असते. यावरून मानवादी प्राण्यांच्या तीव्र संवेदना व्यक्त करण्याकरिता प्रकृतीने गीत गायनाच्या रुपाने एक रक्षीतव्यय (सेफ्टीवाँल्व) उत्पन्न केला आहे असे दिसते. अंतकरणातील भाव व्यक्त करण्याची प्रवृत्ती पशूंमध्ये आढळून येते. पण, बुद्धी व संस्कारक्षमतेमुळे मानवाच्या सुख-दुःख विरहादी भावना अधिक काळ राहतात आणि त्यामुळे त्यांच्या चित्तावर त्या भावनांचा संस्कार आणखी बळावून दीर्घकाळ टिकतो.

समांतर क्रियाविकार व नृत्यगीत

मानसशास्त्राचा असा एक सिद्धांत आहे की, अंत:करणात ज्या प्रकारचे विकार उत्पन्न झाले असतील, त्या विकारांना व्यक्त करणारे हावभाव किंवा उद्गार मनुष्यप्राण्याच्या शारीरिक क्रियांतून आपोआप व्यक्त होतात. याला पाश्चात्य मानसशास्त्रात ’सायकोपॅरलेलिजम’ असे म्हटले आहे. अंत:करणात हास्याची उर्मी झाली की ते हास्य मुखाच्या विशिष्ट विस्फारण्यातून व फुफ्फुसांच्या शीघ्रगतीक संकोच विस्तारामुळे उत्पन्न होणार्‍या कल्लोळातून व्यक्त होते. क्रोधाच्या बाबतीत मुख, कर्ण, घ्राणेंद्रिय, नेत्र व फुफ्फुसे यात विस्फारण्याची प्रतिक्रिया उत्पन्न होते. पण ती प्रतिक्रिया हास्योर्मीपेक्षा फार निराळी असते. व्यक्तिगणिक हास्य-क्रोधाच्या शारीरिक प्रतिक्रिया भिन्न असतात. असे आढळून आले आहे की, बाह्य शारीरिक प्रतिक्रिया व्यक्तीच्या संस्कारांवर अवलंबून असतात म्हणून व्यक्तीच्या हास्य-क्रोधादीहावभावांवरून त्याचा स्वभाव ओळखता येतो. वरील समांतर क्रियांचा क्रम उलट केल्यास तो-तो अविर्भाव धरून विकार उत्पन्न झाल्यासारखे वाटतात व अभ्यासाने उत्पन्न होऊ शकतात. या समांतर क्रियाविकार शास्त्राला धरूनच नृत्य, नाट्य, अभिनय, चित्रकला, संगीत व मूर्तिकलेचा उदय झाला आहे.

नाटकातील नट किंवा नृत्यातील नर्तक तसलेच अविर्भाव करून ते-ते रस व दृश्ये उत्पन्न करीत असतात. तसल्या अविर्भावाचा किंवा दृश्याचा नट-नर्तकावर दीर्घकाळ टिकणारा परिणाम होत नसला तरी प्रेक्षकांवर व श्रोत्यांवर मात्र त्या दृश्यांचा परिणाम होतो व असल्या प्रयत्नशील संस्कारांचा जाणीवपूर्वक पुनर्संस्कार केल्यास त्यातूनच उच्च संस्कृती उत्पन्न होऊ शकते. समांतरक्रिया प्रयत्नांचा उपयोग योगशास्त्रात भरपूर करून घेतला आहे. ध्यानावस्थेत साधक गेल्यानंतर त्याच्या शारीरिक अवस्थेची रचना पाहून व श्वासोच्छवासादी क्रियांचा आवेग पाहून आसन, प्राणायामादी अभ्यासाचा उदय झाला आहे. ध्यानावस्थेत साधक गेल्यानंतर त्याचे जे आसन असते, तसलेच आसन करायचे व ध्यानावस्थेतील साधकाचे श्वासोच्छवास ज्या पद्धतीने चालू असतात, त्याच पद्धतीने आपले श्वासोच्छवास अभ्यासाने बांधून काढल्यास कालांतराने साधकाचे ध्यानधारणा, समाधी अवस्थेत गमन होऊ शकते. असल्या बांधीव श्वासोच्छवासाला ‘प्राणायाम’ म्हणतात. योगमार्गातील अष्टांगयोग याच समांतरक्रिया योगावर (सायकोपॅरलेलिजम) उभारलेला आहे.

बुद्धीसंस्कारामुळे मानवाच्या सुख दुःख विरहादी भावना आणि संस्कार दीर्घकाळ राहतात म्हणून दुःखविरहादी क्लिष्ट भावनांचा आवेग कमी करण्याकरिता मानवाने वरील समांतरक्रिया योगाच्या सहजस्फूर्त शास्त्राच्या आधारे संगीताचा आश्रय घेतला आहे. दुःखविरहादी भावनांना क्लिष्ट म्हणण्याचे कारण की त्या आपल्याला आवडत नाहीत, पण त्यांचे आपल्या जीवनातील स्थान अटळ असते. आपल्या इच्छेविरूद्धही असते. पतंजली आपल्या समाधीपादातील सूत्र पाचमध्ये म्हणतात, ’वृत्तयः पंचतय्यः क्लिष्टाक्लिष्टाः ॥५॥’ पण एक लक्षात घेण्यासारखे आहे की, मनुष्य ज्या भावनेत वा वृत्तीत असतो त्या भावनावृत्तीला साजेसे संगीत, नृत्यादी श्रवणदृश्य त्याला आवडत असते. नव्हे, त्यापासून त्याच्या क्लिष्ट भावनांचा भार कमी होऊन आणि तो भार कमी झाल्यामुळे तेवढ्या प्रमाणात तो त्याच्या मूळ वृत्तीच्या जवळ जात असल्याने त्याला बरे वाटते. मंगलप्रसंगी हर्षरसोत्पादक मंगलवाद्ये वाजविली जातात, तर मृत्यूसंस्काराच्या वेळी विरहादी शांत, रसोत्पादक गीतवाद्ये वाजविली जातात. देवतादर्शनाच्या वेळी घंटा, शंख, झांज, टाळ, मृदुंग, मंजिर्‍या, वेणूनाद आदी अनाहत नादानुसंधानी वाद्ये वाजविली जातात व भक्तीरसाने ओथंबलेल्या आरत्या व गीते म्हटली जातात.

योगिराज हरकरे 
 
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५७
Powered By Sangraha 9.0