मुंबई : प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या 'दुडीया' या कादंबरीचे इंग्रजी अनुवादित पुस्तक दिल्लीच्या नियोगी प्रकाशनने प्रकाशित केलेले आहे. ही कादंबरी भारतातील सर्व लीडिंग ऑनलाईन आणि ऑफलाईन बुक स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. या कादंबरीचे अनेक भाषांमध्ये अनुवादाचे कार्य सुरु आहे तर काहीउ भारतीय भाषांमध्ये तिचे अनुवाद प्रकाशित झाले आहेत. याविषयी विश्वास पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
विश्वास पाटील म्हणतात, "छत्तीसगडच्या त्या जळत्या भूमीमध्ये मला भेटलेल्या अशा अनेक आदिवासी कन्या, पोलीस ऑफिसर्स, तिथल्या तुरुंगांना व जंगलांना मी दिलेल्या भेटी, अरण्यांचा उलटा सुलटा केलेला प्रवास सारे काही या कादंबरीसाठी उपयोगी पडले. त्या मुलाखती व टिपणे नीट मी नोंदवून ठेवली होती. पण पाच सहा वर्ष या विषयाकडे माझे लक्ष वेधले गेले नव्हते. दिवाळी अंकाच्या निमित्ताने काहीतरी लिहायचे म्हणून या नोंदी मी वाचू लागलो. तेव्हा त्यातील सारी पात्रे, परिसर आणि धगधगते वास्तवच माझ्याशी बोलू लागले. तेव्हा मलाही कल्पना नव्हती की ही माझी वेगळ्या विषयावरची कादंबरी इतके टप्पे ओलांडून जाईल."
वाचक अदिती आपल्या परीक्षणात याविषयी म्हणतात, "छत्तीसगड सारख्या राज्यात मी जन्मले आणि वाढले म्हणूनच की काय "दुडीया" ही कादंबरी वाचताना मी अक्षरश: गोठून गेले. पहिल्यांदा मला भावले की , माझी भूमी किती भयानकरित्या जळते आहे." तसेच प्रसिद्ध कन्नड आणि कोकणी लेखक मेलविन रॉड्रिक्स यांनी सुद्धा याबद्दल परीक्षण लिहिले आहे.
आतापर्यंत ही कादंबरी हिंदी (राजकमल) ओडिषा(Black Eagle Books USA), कन्नड (सपना बुक हाऊस बेंगलोर) या प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केली आहे.