आता मराठा समाजाला परदेशी शिक्षणाची संधी

04 Jul 2023 18:50:39
Maharashtra Maratha Students Foreign Education Scholarship
 
मुंबई : राज्य सरकारकडून मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्याची संधी मिळणार असून सयाजीराव गायकवाड- सारथी शिष्यवृत्ती योजनेस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेतून मराठा समाजातील ७५ विद्यार्थ्यांना दरवर्षी शिष्यवृत्ती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय याबैठकीदरम्यान घेण्यात आला.

दरम्यान, मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत येत नाही. ही बाब लक्षात घेऊन क्यू-एस वर्ल्ड रँकिंगमध्ये २००च्या आत मानांकन असलेल्या शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान ही योजना २०२३-२४ पासून राबविण्यात येणार असून सारथी संस्थेकडून पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येणार आहेत.
 
या योजनेसाठी अभियांत्रिकी, वास्तुकला, व्यवस्थापन, विज्ञान, वाणिज्य-अर्थशास्त्र, कला, विधी, औषध निर्माण या अभ्यासक्रमांसाठी ५० पदव्युत्तर, पदवी, पदविका आणि २५ डॉक्टरेट अशी शाखानिहाय शिष्यवृत्ती देण्यात येईल. या योजनेसाठी ५ वर्षाकरिता २७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पहिल्या वर्षासाठी २५ कोटी रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0