मुंबई : 'कभी खुशी कभी गम', 'कुछ कुछ होता है', 'कभी अलविदा ना कहना', यासारखे सुपरहिट चित्रपट देणाऱ्या करण जोहरने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटांच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून यशस्वी पुनरागमन केले आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांची मुख्य भुमिका प्रेक्षकांना भावली. चित्रपटातील अनेक दिग्गज आणि नामवंत चेहऱ्यांमध्ये एक चेहरा झळकला आहे तो आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा, म्हणजेच क्षिती जोगचा. या चित्रपटात तिची लक्षवेधी व्यक्तिरेखा असून तिने ती उत्तमरित्या साकारली आहे. तिच्या या उत्तम अभिनयामुळेच अनेक कलाकारांनी, चाहत्यांनी क्षितीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एका बिग बजेट चित्रपटात, इतक्या मोठ्या दिग्दर्शकाबरोबर, कलाकारांसोबत काम करून क्षितीने तिच्या चाहत्यांना एक सुखद अनुभव दिला आहे.
या चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाल्याबद्दल क्षिती जोग म्हणते, '' यापूर्वीही मी हिंदीमध्ये काम केले आहे. मात्र या चित्रपटात काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी विलक्षण आहे. या चित्रपटात माझ्या व्यक्तिरेखेची इतकी दखल घेतली जात आहे, हे माझ्यासाठी खूप सुखावणारे आहे. मला या चित्रपटात दोन वेगळ्या पिढीतील सुपरस्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळाली. आपण केलेल्या कामाचे दिग्गजांकडून, चाहत्यांकडून कौतुक होणे, हे एका कलाकारासाठी एखाद्या पुरस्कारापेक्षाही मौल्यवान असते. एका कलाकाराला आणखी काय हवे असते. या सगळ्यांसोबत काम करताना खूप मजा आली. खूप शिकता आले. एकंदरच हा अनुभव माझ्यासाठी कमाल होता.''
तर दिग्दर्शक करण जोहर म्हणतात, '' क्षितीचा अभिनय मी पाहिला असून ती एक गुणी अभिनेत्री आहे. मला खात्री होती ती या व्यक्तिरेखेला ती योग्य न्याय देणार. चित्रपट प्रदर्शित झाला असून क्षितीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. क्षिती अतिशय प्रोफेशनल अभिनेत्री आहे. कामाच्या बाबतीत ती अतिशय प्रामाणिक आहे. एखादी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ती जी मेहनत घेते, ते मी सेटवर पाहिले आहे आणि म्हणूनच ती कोणतीही भूमिका इतकी चपखल बजावू शकते.''
या चित्रपटाने प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच ११.५० कोटींची कमाई केली. त्यानंतर विकेंडला या चित्रपटाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली. जगभरात या चित्रपटाने ५० कोटींचा आकडा पार केला आहे. प्रदर्शनावेळी ११ कोटींची ओपनिंग देणाऱ्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने शनिवारी जवळपास १६.०५ कोटींचा व्यवसाय केला. तर सकनिल्कच्या आकड्यानुसार, 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' ने प्रदर्शनाच्या तिसर्या दिवशी १९ कोटींच्या जवळपास कमाई केली. त्यामुळे विकेंडची एकूण कमाई ४६.३३ कोटींवर गेली आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्याशिवाय धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी, आमिर बशीर, तोता रॉय चौधरी, चुर्णी गांगुली, क्षिती जोग आणि अंजली आनंद यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.