‘२० ज्येष्ठ रंगकर्मींना प्रत्येकी ७५ हजारांची मदत’, अशोक सराफ यांचा नवा उपक्रम

    31-Jul-2023
Total Views |

ashok saraf




मुंबई :
मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज विनोदवीर अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी व अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी नुकताच ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’ हा एक नवा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ रंगकर्मी, ज्येष्ठ कलाकार, बॅकस्टेजवर काम करणारे तंत्रज्ञ, वयामुळे ज्यांना काम करणे शक्य होत नाही. अशा गरजू लोकांना मदत करण्यात येणार आहे. ‘कृतज्ञ मी कृतार्थ मी’या उपक्रमाचे आयोजन २९ जुलैला स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात पडद्यामागील २० ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करण्यात आला. अशोक आणि निवेदिता सराफ यांनी या कलाकारांना प्रत्येकी ७५ हजारांची मदत केली आहे.
 
अशोक सराफ या उपक्रमाविषयी माहिती देताना म्हणाले, “मला ज्या लोकांनी मदत केली त्यांना मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. माझ्या कुटुंबाकडून या २० ज्येष्ठ कलाकारांना दिलेली ही लहानशी भेट आहे. यामुळे त्यांना मदत झाली तर मला आनंदच आहे. निवेदिताची ही सगळी कल्पना असून मी सुरुवातीला एवढ्या गोष्टी जुळून येतील की नाही? म्हणून घाबरलो होतो परंतु, सगळे लोक आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले.”
 
नव्या उपक्रमात भाऊ सुभाष सराफ यांची साथ मिळाली आणि अमेरिकेत राहणारे संजय पैठणकर यांनी १० लाखांची मदत केल्याचे अशोक सराफ यांनी सांगितले. विद्या पटवर्धन, उपेंद्र दाते, बाबा पार्सेकर, अर्चना नाईक, वसंत अवसरीकर, दीप्ती भोगले, सुरेंद्र दातार, विष्णू जाधव, रवींद्र नाटळकर, नंदलाल रेळे, अरुण होर्णेकर, प्रकाश बुद्धिसागर, पुष्पा पागधरे, उल्हास सुर्वे, एकनाथ तळगावकर, सीताराम कुंभार, हरीश करदेकर, शिवाजी नेहरकर, किरण पोत्रेकर, वसंत इंगळे या २० ज्येष्ठ रंगकर्मींचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.