लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे सामाजिक समन्वयासाठीचे योगदान

    31-Jul-2023
Total Views |
Article On Lokshahir Anna Bhau Sathe

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे आयोजित युट्यूब व्हिडिओ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या परभणीच्या अनुष्का हिवाळे हिने अण्णा भाऊंविषयी मांडलेले विचार...

स्वातंत्र्य अन् न्यायाचे जाणलेस तू मर्म रुजविलास साहित्यातून मानवतेचा धर्म तुकाराम तू विद्रोही होतास अंगार साहित्यातून मांडलास समतेचा जागर लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे सामाजिक समन्वयासाठीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. लोकजीवनाचे भाष्यकार असलेले साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या समग्र साहित्यात गावकुसा बाहेरील, खेड्यापाड्यातील, वाड्यातांड्यातील उपेक्षित, दुर्लक्षित, वंचित, अठरापगड जातीतील व्यक्तिरेखा या गुण्यागोविंदाने वावरताना दिसतात. हा सामाजिक समन्वय साधताना ‘तू गुलाम नाहीस, तर स्वतंत्र जीवनाचा निर्माता आहेस. ही पृथ्वी तुझ्या तळहातावर तरललेली आहे,’ असं म्हणत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हा माणसांमधला आत्मविश्वासही जागा करतात.

ही महाराष्ट्र भूमी घामाची, श्रमाची, प्रेमाची, संत शाहिरांची, त्यागाच्या तलवारीची आहे. म्हणूनच या ’महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया’ असं सांगतानाच, ’एकीचा बांधू किल्लारे, शिवारी चला’ असा एकजुटीचा संदेश देऊन, ‘एकीच्या बळाने बदलू ही दुनिया सारी,’ असे आवाहनही ते करतात.

अण्णा भाऊ साठे हे जनतेची वेदना जाणणारे, जनतेच्या मनभावना ओळखणारे, जनतेची कदर करणारे, लोकशाहीर होते. या जगाचा मूळ नायक असलेल्या माणसाचं आत्मबल जाग करणारं लेखन त्यांनी केलं. माणसांवर, जगावर, जगण्यावर आणि जीवनावर नितांत प्रेम असलेले अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबर्‍या, १३ कथासंग्रह, एक शाहीर, एक प्रवास वर्णन, १६ नाटके-नाटिका इतकं साहित्य लिहिलं आहे. या सर्व साहित्यांतून त्यांनी एकता आणि समतेची शिकवण दिल्याचं प्रकर्षाने आपल्याला जाणवतं. जीवन यात्री कथाकार अण्णा भाऊ साठे यांची जीवनावर निष्ठा होती. ते मानवमुक्ती लढ्याचे नायक होते. त्यांनी केवळ भूक आणि अश्रूंची कथा लिहिली नाही, तर त्यांनी बहुजनांच्या इतिहासाची गौरवगाथा लिहिली आहे.

एकता देशभक्तीची दिलीस तू शिकवण
अखंड महाराष्ट्राचे शाहीरा
गायिलेस तू कवन
विज्ञानवादी, वास्तववादी लेखन करणारे मानवतावादी साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांनी कसलीच विषमता नसलेला समतामूलक समाज निर्माण व्हावा, ही वैश्विक भूमिका आपल्या साहित्यातून मांडली. सामाजिक, राष्ट्रीय ऐक्याचा संदेश त्यांनी आपल्या समग्र लेखणीतून दिला. जात, धर्म, लिंग, भाषा, प्रांत हे सर्व भेदाभेद दूर सारून, माणसांमध्ये माणुसकी पेरून सर्व प्रकारची दूरी मिटवून सर्व स्तरातील माणसांमध्ये समन्वय घडून आणणारे ते साहित्यिक होते. म्हणूनच स्त्रियांना आपल्या साहित्यात सन्मानाने नायिका करणारे आणि स्त्रीशक्ती, राष्ट्रशक्ती हे जाणणारा हा वाटेगावचा वाटाड्या समतेची मशाल घेऊन, मुंबई वाया रशियाला गेला.

वाटेगावचा वाटाड्या, वाट दावून गेला,
तहानलेल्या जीवाला समतेचा माठ दावून गेला
अण्णा भाऊ साठे यांच्या लिखाणाचा उद्देश माणसांचं जगणं जसं आहे, ते त्याहून अधिक सुंदर करणं हा आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्त्वाचं योगदान देणारे, लोकनाट्याचे जनक आपल्या शाहिरीतून ‘प्रथम वंदन भूमाते चरणा, तदनंतर शिवबा चरणा शहिदांच्या बलिदानांना स्मरून, गातो कवना’ असं कृतज्ञपूर्वक म्हणणारे अण्णा भाऊ साठे यांचे सामाजिक समन्वयासाठीचे योगदान महत्त्वाचं असचं आहे. शेवटी जाताना त्यांच्याच शब्दात म्हणेन-

एकजुटीच्या या रथावरती, आरूढ होऊन चल बापुढती, नवमहाराष्ट्र निर्मूलन जगती,
प्रकट करी निज नाव.

अनुष्का हिवाळे, परभणी
९८६००५३४९५