माझ्या रक्तात गद्दारी नाही तर शरद पवार : आ. जितेंद्र आव्हाड
03-Jul-2023
Total Views |
मुंबई : “माझ्या रक्तात फक्त आणि फक्त शरद पवारच असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हड यांनी केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेत पक्ष नियुक्त्यांची घोषणा केली. यावर जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेत या नियुक्त्यांवर सवाल उपस्थित केला. ते म्हणाले, आताच एक प्रदेशाध्यक्ष , महिला अध्यक्ष आणि पक्ष प्रतोदपदाची निवड पत्रकार परिषदेत करण्यात आली त्या नियुक्त्या कायदेशीर आहेत का? तसेच, त्या नियुक्तीला संवैधानिक मान्यता होती का?, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले की, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष हे शरद पवारच असतील, यावर बोलताना आव्हाड म्हणाले, असे जर असेल तर शरद पवारांनी घेतलेला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांबाबतचा निर्णय तुम्हाला मान्य आहे का, असा खडा सवाल त्यांनी यावेळी विचारला. दरम्यान, आव्हाडांनी कायदेशीर पाढा वाचतानाच पक्ष हा संविधानानुसार, पक्षाच्या घटनेनुसार चालतो, असे आ. जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच, निवडणुक आयोगाने मान्यता दिलेले पक्षाची घटना ही शरद पवारांकडे असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. पक्षाच्या अध्यक्षांनी निलंबित केले असताना तुम्ही नियुक्त्या कशा करु शकता, त्याचा अधिकार कुणी दिला असेही ते म्हणाले.