ऑनलाइन वीज बिल भरण्याचे महावितरणकडून आवाहन

29 Jul 2023 17:13:17
Mahvitaran Appealed To Consumers Pay Online Bills

मुंबई
: महावितरणकडून ऑनलाईन वीजबिल भरणा करण्यासाठी ग्राहकांना आवाहन करण्यात येत आहे. महावितरणकडून यबाबत आवाहन करण्यात येत असून सुरक्षित व सुविधाजनक असणाऱ्या ऑनलाइन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणच्या वीजबिल रोखीत भरण्यावर कमाल मर्यादा राहणार आहेत.

दरम्यान, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांनी ३१ मार्च २०२३ नुसार दिलेल्या आदेशान्वये १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणच्या रोखीत वीजबिल भरण्याच्या कमाल रकमेवर मर्यादा राहणार आहे. महावतिरणचे सर्व ग्राहक (लघुदाब कृषी वर्गवारी सोडून) यांना दरमहा कमाल मर्यादेत केवळ ५ हजार रुपयांपर्यंतचे वीजबील भरता येणार आहे. तसेच लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना वीजबिल रोखीत भरण्यासाठीची दरमहा कमाल मर्यादा १० हजार एवढी राहणार आहे.

महावितरणच्या वतीने वीजग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजदेयकाचा भरणा करता येवू शकतो. या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पध्दतीत ग्राहक वीजदेयकाचा भरणा क्रेडिट/डेबिटकार्ड, नेटबँकींग व युपीआय इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत करू शकतो. तसेच भारत बिल पेमेंट (BBPS) मार्फत देखील वीज बिल भरणा करता येऊ शकतो. या व्यतिरिक्त महावितरणने रु.५,०००/- पेक्षा जास्त बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना RTGS/NEFT द्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी लागणारी आवश्यक ग्राहक निहाय बँकेच्या माहितीचा तपशिल वीजबिलावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व पध्दतीने वीजबिल भरणा निशुल्क आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने देयकाचा भरणा केल्यास बिल रकमेच्या ०.२५ टक्के (जास्तीत जास्त रु. ५००/-) इतकी सवलत देखील देण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत महावितरणचे ११० लाख ग्राहक (६५ टक्के) ऑनलाईन सुविधेचा लाभ घेत असून यातून दरमहा महावितरणला साधारणत: २२५० कोटी महसूलाची वसूली होते. दरम्यान, रांगेत वेळ वाया न घालवता महावितरणने उपलब्ध करुन दिलेल्या निशुल्क ऑनलाईन भरणा सेवांचा वीज ग्राहकांनी फायदा घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले.



Powered By Sangraha 9.0