आंबा-काजू उत्पादकांसाठी राज्य सरकारतर्फे मोठी घोषणा!

29 Jul 2023 16:07:46
Agricultural Minister Munde On Kokan Region Farming

मुंबई
: आंबा-काजू उत्पादकांसाठी राज्य सरकारतर्फे मोठी घोषणा करण्यात आली असून कोकणातील आंबा, काजूसह फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. काजू महामंडळाच्या धर्तीवर आंबा महामंडळ स्थापन करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

मंत्री मुंडे म्हणाले की, सध्याची बदलती नैसर्गिक परिस्थिती पाहता पावसाची अनियमितता वाढत आहे. राज्यातील विविध भागातील पाऊस व हवामान मोजणाऱ्या यंत्रणा कमी आहेत. त्यामुळे हवामान मापक यंत्रे कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पावसाच्या पुरेशा नोंदी न कळल्याने शेतकऱ्यांना पीकविम्याच्या लाभासाठी मुख्य अडचण ठरते. त्यावर राज्य शासनाने सकारात्मक पाऊल टाकत आता या हवामान केंद्रांची संख्या आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अचूक हवामान मोजणे शक्य होणार आहे.

केंद्र शासनाच्या अखत्यारीत असणा-या विषयाबाबत केंद्रीय कृषी मंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या योजनांसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहेत. कोकणातील शेतकऱ्यांच्या समस्या या फलोत्पादन, पणन ,रोजगार हमी योजना, ऊर्जा विभाग यांच्याशी संबंधित असल्याने यासर्व विभागांचे मंत्री आणि अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्यात येतील, असे मंत्री मुंडे यांनी सांगितले.

कोकणातील आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विधानभवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, राजन साळवी, राणा जगजितसिंह पाटील, मनीषा चौधरी, शेखर निकम यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Powered By Sangraha 9.0