नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य सरकारकडून भरघोस मदत

28 Jul 2023 19:37:10
Government of Maharashtra Natural disaster victims

मुंबई
: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात दमदार पाऊस झाला असून विविध ठिकाणी नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. या पार्श्वभूमीवर सरकारकडून नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना भरघोस मदत देण्यात आली आहे. दरम्यान, काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नेहमीच अशा प्रसंगात आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला असून नुकसानीसाठी प्रती कुटुंब दहा हजार रुपये वाढीव मदतीची आणि दुकानदार, टपरीधारक यांना सुद्धा आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.

दरम्यान, सरकारने लागू केलेली वाढीव मदत जून ते ऑक्टोबर, २०२३ या चालू पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीसाठी देण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत पुढीलप्रमाणे आहेत.

  • प्रति कुटुंब १० हजार रुपये
  • कपड्यांचे नुकसान आणि घरगुती भांडीकुंडी यांच्या नुकसानीसाठी आता १० हजार रुपये आर्थिक मदत करण्यात येईल.

  • दुकानदारांना ५० हजार रुपयांपर्यंत मदत
  • नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानात दुकानदारांना पंचनाम्याच्या आधारे नुकसानाच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येईल.
  • जे स्थानिक रहिवाशी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्डधारक आहेत अशा दुकानदारांपैकी अधिकृत दुकानदारांना ही मदत मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

  • टपरीधारकांना १० हजार रुपयांपर्यंत मदत
  • नुकसानग्रस्त टपरीधारकांनासुद्धा पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपये पर्यंत विशेष बाब म्हणून आर्थिक मदत देण्यात येईल.
  • जे स्थानिक रहिवासी आहेत, ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशनकार्डधारक आहेत अशा अधिकृत नोंदणीकृत व परवानाधारक टपरीधारकांना ही मदत देण्यात येईल.

Powered By Sangraha 9.0