होमगार्ड १८० दिवस कायम राहणार; गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
28 Jul 2023 19:57:42
मुंबई : "आपली इतर कामे सांभाळून ऐच्छिक सेवा म्हणून होमगार्ड हे काम स्वइच्छेने केले जाते. संकटकाळात होमगार्डस करून केली जाणारी मदत आणि इतर गोष्टी लक्षात घेता होमगार्डना वर्षात १८० दिवस कायम ठेवण्याचा निर्णय तसाच कायम ठेवला जाईल," अशी घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधिमंडळ अधिवेशनात दि. २८ जुलै रोजी विधान परिषदेत झालेल्या चर्चेवेळी फडणवीसांनी ही घोषणा केली आहे. रासपचे आमदार महादेव जानकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी हे उत्तर दिले आहे.
गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, "देशातील अनेक राज्यांमध्ये होमगार्ड ला १८० दिवस काम दिलं जातं त्याच धर्तीवर माझ्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती आणि त्या समितीने होमगार्ड ला १८० दिवस कायम करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात होमगार्डच्या साठी जो निधी देण्यात येत होता तो साडेतीनशे कोटींवरुन १७५ कोटी करण्यात आला. त्यामुळे होमगार्डन १८० दिवस कायम करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला होता. माझ्या कार्यकाळात २०१९ साली घेण्यात आलेला तो निर्णय आम्ही पुन्हा एकदा कायम ठेवला असून होमगार्डला इथून पुढे १८० दिवस कायम ठेवण्याचे नक्की करण्यात आले आहे," असे फडणवीसांनी विधान परिषदेत बोलताना म्हटले आहे.