मोहरमदरम्यान मोठ्या आवाजात ढोल वाजविणे बेकायदेशीर : कोलकाता उच्च न्यायालय
28 Jul 2023 18:09:40
नवी दिल्ली : मोहरम सणाच्या दरम्यान मोठ्या आवाजात ढोल वाजविणे बेकायदेशीर असून कोणताही धार्मिक सिद्धांत त्याची परवानगी देत नाही. त्यामुळे राज्यात आगामी मोहरम सणाच्यादरम्यान पोलिसांनी ढोल वाजविण्याचे नियमन करावे, असे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल पोलिसांना दिले आहेत.
प. बंगाल सरकारने मोहरम सणाच्यावेळी ढोल वाजविणे हा धार्मिक कार्याचा भाग अशू शकतो, असे उच्च न्यायालयास सांगितले होते. मात्र, मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती टी. एस. शिवग्ननम आणि न्या. हिरण्मय भट्टाचार्य यांच्या खंडपीठाने राज्य सरकारने हे म्हणणे फेटाळून लावले आहे
यावेळी न्यायालयाने म्हटले की, मोहरम सणादरम्यान अखंडपणे ढोल-ताशे वाजविण्यास परवानगी नाही. मात्र, तसे होत असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे खरे असेल तर ते निःसंशयपणे बेकायदेशीर आणि संबंधित नियमांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे ढोल वाजवण्याच्या वेळेचे नियमन करणारी सार्वजनिक सूचना जारी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले जातील, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. राज्याने धर्माचा अधिकार आणि जगण्याचा अधिकार यांच्यात समतोल राखला पाहिजे, असेही खंडपीठाने नमूद केले आहे.
राज्यात २९ जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या मोहरम सणादरम्यान दिवस-रात्र ढोल वाजविण्यात येण्याच्या धोक्यास अधोरेखित करणारी जनहित याचिका शगुफ्ता सुलेमान यांनी दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हा आदेश दिला आहे.