जनकल्याणासाठी 'बीएमसी'तील पालकमंत्री कार्यालय सुरूच राहणार

28 Jul 2023 17:55:10
Cabinet Minister Mangalprabhat Lodha In Assembly

मुंबई
: 'जनकल्याणासाठी महापालिकेतील पालकमंत्री कार्यालय सुरूच राहणार', अशी भूमिका मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत मांडली. विरोधकांच्या आरोपांना मंत्री लोढा यांनी विधानसभेत ठणकावून उत्तर दिले. ते म्हणाले, आजवर फक्त पालकमंत्र्यांसाठी उघडी असणारी बृहन्मुंबई महापालिकेची दारे, आमच्या निर्णयाने जनतेसाठी खुली झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कोणीही स्थानिक लोकप्रतिनिधी महानगरपालिकेच्या कार्यालयात येऊ शकत नाही, नागरिकांच्या समस्या वॉर्ड ऑफिस मध्ये अडकून राहतात, त्यांना त्यांच्या हक्कांसाठी दाद मागायला मंत्रालयात जाण्यासाठी सुद्धा परवानगी लागते, हे सर्वच लक्षात घेऊन आम्ही जनतेच्या सोयीसाठी पालकमंत्री समस्या निवारण कक्ष उभा केला तर त्यामध्ये काय अडचण आहे? असा सवाल मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत केला.

तसेच, विधानसभेत काँग्रेस पक्षाच्या आमदार वर्षा गायकवाड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री लोढा यांनी सांगितले की, हे कार्यालय फक्त जनकल्याणासाठी असून, येथे कोणतेही राजकीय कार्य होणार नाही. या कक्षामध्ये सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींचे स्वागत असून या कार्यालयाला कितीही विरोध झाला तरी, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हे कार्यालय सुरू राहील, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच, जे या निर्णयाचा विरोध करत आहेत, त्यांनी हे सुद्धा विचारले पाहिजे की, "महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आमदार व तत्कालीन पालकमंत्री अस्लम शेख यांना राहण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारितीला हायड्रॉलिक इंजिनियरचा बंगला कोणत्या उद्देशाने दिला होता?", अशी विचारणा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विरोधीपक्षाला केली.




Powered By Sangraha 9.0