नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर राज्यसभेत बोलत असतांना विरोधकांनी गोंधळ घातला. यावर नाराज झालेल्या परराष्ट्र मंत्र्यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावले. ते म्हणाले की, विरोधक 'इंडिया' (विरोधी आघाडीचे नाव) असल्याचा दावा करतात. परंतु ते देशाचे राष्ट्रीय हित ऐकण्यास तयार नसतील तर ते कोणत्या प्रकारचे 'इंडिया' आहेत?
भारताच्या परराष्ट्र धोरणातील यश आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडच्या परदेश दौऱ्यांबद्दल संसदेत माहिती देत असतांना विरोधकांनी गोंधळ घातला. याचं गदारोळात जयशंकर यांनी सभागृहात माहिती दिली.
जयशंकर म्हणाले की, विरोधकांनी 'पक्षपाती राजकारणाला' प्राधान्य दिले आहे हे दुर्दैवी आहे. ही केवळ सरकारची उपलब्धी नसून देशासाठीची उपलब्धी आहे. "जर तुम्ही राष्ट्रपतींचा आदर करू शकत नाही, उपराष्ट्रपतींचा आदर करू शकत नाही, तुम्ही पंतप्रधानांचा आदर करू शकत नाहीत, तर ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे.”