मदनदासजी देवी एक समृद्ध व्यक्तिमत्वं : भैय्याजी जोशी

26 Jul 2023 18:14:09
RSS Bhaiyyaji Joshi On Madandasji Devi

मुंबई
: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा.स्व.संघ) माजी सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे सोमवारी बंगळुरू येथे निधन झाले. त्यानिमित्त लखनौच्या निराला नगर येथील माधव भवन सभागृहात अवध प्रांतातर्फे शोकसभा आयोजित करणात आली होती. "लोकांना समजून घेण्याची अद्भुत क्षमता असलेले एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणजे मदनदासजी देवी. ज्या ठिकाणी ठोस भूमिका घेऊन बोलणे गरजेचे असते, तिथे ते स्पष्टपणे बोलायचे. जिथे समोरच्याला थांबवायचंय तिथे ते त्यास थांबवत असे. जिथे विरोध अपेक्षित आहे तिथे ते विरोधही करायचे. त्यांचे व्यक्तिमत्वं अत्यंत समृद्ध तर होतेच मात्र त्यांची विवेकबुद्धीही अतिशय पारदर्शक आणि शुद्ध होती.", असे म्हणत रा.स्व.संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी मदनदासजींच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या साध्या-सोप्या जीवनाचे यावेळी स्मरण करण्यात आले.

भैय्याजी पुढे म्हणाले की, "कार्यकर्त्यांना पुरेसा वेळ देणे हे मदनदासजींचे खास वैशिष्ट्य होते. एखाद्याकडे वाईट गुण असल्यास त्या व्यक्तीस कधी वेगळे न लेखता त्याच्या मानसिकतेचा योग्य विकास ते करत असे. यामुळेच देशातील हजारो कार्यकर्ते मदनदासजींना आपले मानत होते. त्यांच्या मोठ्या मनाने आणि आपुलकीने जीवन जगण्याच्या शैलीमुळेच हे शक्य झाले. कुठल्याही कार्यकर्त्याने चूक केल्यास अथवा चूकीचे बोलल्यास त्याला सुधरत असे. घसरून पडल्यानंतर चौकशी करणारे बरीच जणं भेटतात मात्र मदनदासजी हे व्यक्ती घसरण्यापूर्वी सावध करणाऱ्यांपैकी एक होते."

RSS Bhaiyyaji Joshi On Madandasji Devi

मदनदासजींच्या जीवनातील प्रसंग सांगताना ते म्हणाले,"सामाजिक क्षेत्रात अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी शरीर आणि मन शुद्ध ठेवावे लागते. मदनदासजींनी आपल्या सामाजिक जीवनात वावरताना या गोष्टींचे तंतोतंत पालन केले. १९६० ते १९६४ दरम्यान संस्थेच्या कामात रुजू असताना त्यांनी कोणत्याही गोंधळाशिवाय, कोणतीही तडजोड न करता, सरळ-सोप्या पद्धतीने आपले जीवन जगले."

राष्ट्रधर्माचे संचालक मनोजकांत यांनी मदनदासजींच्या श्रद्धांजली सभेत त्यांचे स्मरण केले. ते म्हणाले की, "१९८९ मध्ये कानपूरच्या राजस्थान भवनातील अभ्यास वर्गादरम्यान त्यांच्या सहवासात राहण्याची मला संधी मिळाली. त्यांचे जीवन जितके औपचारिक होते तितकेच अनौपचारिकही होते. ते कार्यकर्त्यांची लहान-लहान टोळी करून त्यांच्याशी संवाद साधत आणि त्यासोबतच त्यांच्या गीतसरावाचा अभ्यासही ते घेत असे. ऋषी परंपरेतील जितके प्रचारक मला माहीत होते, त्यापैकी ते एक होते. संघटनेतील सामूहिक निर्णय प्रक्रियेचे ते पालन करायचे. ज्या कामात आपल्याला आनंद मिळतो ते काम आपण करायला हवे यावर ते नेहमी भर देत असत. त्यामुळे एखाद्या सामान्य बैठकीचे वातावरण ही ते आनंदी ठेवायचे."

RSS Bhaiyyaji Joshi On Madandasji Devi

भारतीय जनता पार्टीचे उत्तर प्रदेशचे संगठन महामंत्री धर्मपाल सिंह म्हणाले, "मदनदासजी देवींच्या सहवासात असताना प्रचंड ऊर्जा मिळायची. ते कार्यकर्त्यांच्या विकासाची नेहमी काळजी करायचे. देशभरातील असंख्य कार्यकर्त्यांसाठी ते नक्कीच प्रेरणास्थान राहतील." अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजशरण शाही म्हणाले, "मदनदासजी हे अभाविपचे शिल्पकार होते. १९७०-१९९२ पर्यंत ते विद्यार्थी परिषदेवर कार्यरत होते. राष्ट्रीय संघटन मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. अभाविपच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे जीव्हाळ्याचे संबंध होते. लाखो कार्यकर्त्यांचे ते प्रेरणास्थान आहेत."

"संघाच्या विविध क्षेत्रांत राहून जे प्रचारक कार्य करत असतात, त्याचे जीवन मोठ्या अडचणीतून जात असते. पण त्याबाबत ते कधी व्यक्त होत नाहीत. अशा प्रचारकांपैकी एक आदर्श जीवन जगणारे मदनदासजी होते.", असे महामंडलेश्वर यतीन्द्रानंद महाराज म्हणाले.

श्रद्धांजली सभेत अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख प्रमुख स्वान्त रंजन, क्षेत्र प्रचारक अनिलजी, प्रांत प्रचारक कौशलजी, उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक, कॅबिनेट मंत्री स्वतंत्रदेव सिंह, मंत्री सतीश शर्मा, माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा, प्रांत संपर्क प्रमुख गंगा सिंहजी, आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0