अमेरिकेचा अ‘विवेकी’ चेहरा

26 Jul 2023 21:57:06
American Pastor boasts about Christian Conversions

जिझसला मानत नाही. त्याला फक्त प्रशासकीय नीती आणि योजना माहिती आहेत म्हणून त्याला व्हाईट हाऊसमध्ये पाहायचं आहे का? उद्या तो व्हाईट हाऊसमध्ये त्याचे ते विचित्र देव घेऊन गेला, तर चालेल का? त्याची श्रद्धा जिझसवर नाही. त्यामुळे त्याचे जो कोणी समर्थन करेल, तो सर्वशक्तिमान येशूच्या विरोधात जाईल. त्याचा विरोधक साक्षात लॉर्ड येशू होईल.” कुठली आणि कशासाठी आहेत ही विधाने? तर हे अकलेचे तारे तोडले आहेत अमेरिकेच्या पास्टर हॅक कुन्नेमॅन याने. तो लॉर्ड ऑफ हॉस्टस चर्च ओमाहा नेब्रास्काचा पास्टर अर्थात पाद्री आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी करणार्‍या विवेक रामास्वामीबद्दल पास्टर हॅक कुन्नेमॅनने ही विधानं केली आहेत. विवेक रामास्वामी हे धर्माने हिंदू. ते हिंदू देव, धर्म आणि श्रद्धा जपतात. उच्चशिक्षित आणि तितकेच बुद्धिमान आणि प्रशासनात्मक नीतीयोजनांबाबत जाण असलेल्या विवेक रामास्वामी यांच्या लोकप्रियतेचा वाढता आलेख पाहून राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारीवर असलेले इतर इच्छुक अस्वस्थ झाले आहेत. या पाश्वर्र्भूमीवर ट्रम्प यांनाही परत राष्ट्राध्यक्षपदाचे वेध लागले आहेत. मात्र, बायडन यांच्यासोबतच विवेक रामास्वामी यांच्या रूपाने ट्रम्प यांना प्रबळ स्पर्धक उभा राहिला. अशावेळी ट्रम्प यांच्या समर्थनार्थ उभे कोण राहिले, तर हॅक कुन्नेमन!

विवेक रामास्वामी यांच्याबाबत टीका करण्यासारखे काही नाही म्हणून कुन्नेमॅन याने त्यांच्या देव, धर्मावर आणि श्रद्धांवर अतिशय निषेधार्ह विधानं केली. हे सगळे ते ‘मेल्टिंग पॉट’ म्हणून ख्याती मिरवणार्‍या अमेरिकेच्या समानतेच्या तत्वावर, मानवतेच्या विचारांवर काळिमा फासणारे आहे. काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेच्या एका समितीने म्हणे अहवाल केला होता की, भारतात अल्पसंख्याकांच्या धर्मावर गदा आली आहे. त्यांचे हक्क हिरावलेजात आहेत. आता हॅकच्या या घाणेरड्या विधानांमुळे अमेरिकेमध्ये किती समानता पाळली जाते आणि जात, धर्म, वंश वगैरेंवरून लोकांना कशा प्रकारे हिंसेला सामोरे जावे लागते, हे स्पष्ट झाले आहे.

अमेरिकेमध्ये प्रोटेस्टंट पंथाचा ख्रिस्ती समाज बहुसंख्य आहे. जो येशूला मानतो त्यालाच स्वर्ग मिळतो आणि जो येशूवर विश्वास ठेवत नाही, त्याला नरक मिळतो, अशी सोपी स्वर्ग-नरकाची व्याख्या या प्रोटेस्टंट ख्रिस्ती समाजाची आहे. तसेच,येशूशिवाय इतरांना मानणारे सगळे खोटे आहेत, असेही यांचे म्हणणे. अशा बहुसंख्य प्रोटेस्टंटपंथीय लोकांना धर्मांधतेने भुलवतायेईल, असे हॅकला वाटले. त्यामुळेच तर त्याने येशूच्या नावाने विवेक रामास्वामींना समर्थन देऊ नका, असे आवाहन केले.

पण, या हॅकचा पूर्वार्ध पाहिला तर जाणवते की, तो आणि त्याची पत्नी ब्रेंडा हे दोघेही सांगत असतात की त्यांच्यावर येशूची कृपा झाली आहे आणि हॅक तर प्रेषितच आहे, तर अशा या स्वयंघोषित प्रेषिताचे हॅकचे जादुई कर्तृत्व काय? तर हस्तस्पर्शाने तो युवक-युवतींच्या चेहर्‍यावरच्या तारुण्यपिटिका घालवतो.हॅक प्रवचनामध्ये आवाहन करतो की, ”किशोरवयीन मुलांनो, तुमच्या चेहर्‍यावर तारुण्यपिटिका येतात का? येशूच्या छत्रछायेखाली त्याने दिलेल्या जादुई शक्तीमुळे मी किशोरवयीन मुलामुलींच्या तारुण्यपिटिका अगदी मुळासकट घालवून देतो,” अशी जादू करणार हॅक कुन्नेमॅन, तर ब्रेंडानेही कोरोनाच्या महामारीदरम्यान म्हणे, कोरोनाला परत जायचे आदेश दिले होते. (असे तिचे आणि तिच्या पतीचे पास्टर हॅक कुन्नेमॅनचे म्हणणे). या हॅकने मागे भविष्य वर्तविले होते की, ”ट्रम्प पुन्हा सत्तेत येणार. कारण, ते धर्माचे आदेश मानतात. ते गर्भपातविरोधी नीती जपणारे इस्रायलच्याही विरोधात आहेत.” पण, हॅकची भविष्यवाणी खोटी ठरली आणि ट्रम्प हरले, जो बायडन जिंकले. यावर हॅकचे म्हणणे, ”कदाचित लॉर्ड येशूला आणखीन चांगली भविष्यवाणी वदवून घ्यायची असेल,” तर असा हा हॅक!

हॅकचे हे सगळे कर्तृत्व पाहिले की त्याला किती गांभीर्याने घ्यायचे, हा प्रश्न उरतो. तरीही धर्म, श्रद्धा, प्रथा आणि भेदाभेद याचा पगडा आजही अमेरिकेतील जनतेवर आहे का? महिलांना गर्भपाताचा अधिकार असावा की नसावा, यावर अमेरिकेचे सत्ताकारण चालते. आजही अमेरिकेत वर्णभेदावरून दंगे होतात, हिंसा होते. या सगळ्या परिक्षेपात हिंदू विवेक रामास्वामींचे नेतृत्व अमेरिकेमध्ये स्वीकारले जावे, असे वाटते. ब्रिटनमध्ये घडले ते अमेरिकेतही घडूच शकते!

९५९४९६९६३८
Powered By Sangraha 9.0