मुंबई : कारगिल विजय दिवसानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी लडाखमधील द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकावर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला की, भविष्यात गरज पडल्यास भारत नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडू शकतो. यासोबतच भारत आपल्या अखंडतेशी कधीही तडजोड करणार नाही, असेही ते म्हणाले.
कारगिल युद्ध स्मारकावर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, 'त्यावेळी आम्ही नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडली नव्हती, याचा अर्थ आम्ही नियंत्रण रेषा ओलांडू शकलो नाही असा होत नाही. आम्ही एलओसी ओलांडू शकलो असतो, आम्ही एलओसी ओलांडू शकतो आणि भविष्यात गरज पडल्यास एलओसी ओलांडू. मी देशवासीयांना याची खात्री देतो.
राजनाथ सिंह पुढे बोलतांना म्हणाले की, 'कारगिल विजय दिनी येथे येऊन मला खूप आनंद होत आहे. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांना मी वंदन करतो. या निमित्ताने मी संपूर्ण देशाचे अभिनंदन करतो. या शूर सैनिकांमुळे आपला देश उभा आहे. सीमेचे रक्षण करण्यासाठी जवानांनी खूप शौर्य दाखवले, जे इतिहासात सदैव स्मरणात राहील.
कारगिल युद्धाचा संदर्भ देत राजनाथ सिंह म्हणाले, 'त्यावेळी आम्ही नियंत्रण रेषा ओलांडली नाही कारण आम्ही आमच्या मूल्यांवर कायम होतो, आम्ही आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करतो. पण, मला स्पष्ट करायचे आहे. भविष्यात गरज पडल्यास आम्ही नियंत्रण रेषा ओलांडू. तेव्हा आम्ही नियंत्रण रेषा ओलांडली नव्हती, पण गरज पडल्यास आम्ही नियंत्रण रेषा ओलांडू शकतो.
प्रसारमाध्यमांना संबोधित करताना लष्करप्रमुख मनोज पांडे म्हणाले की, 'कारगिल युद्धात शत्रूच्या सैन्याला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत. सैनिकांचे बलिदान विसरता येणार नाही आणि त्यासाठी आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू. आजूबाजूला दिसणारी ही शिखरे शत्रूने काबीज केली होती. पण ती आपल्या शूर सैनिकांनी ही सर्व शिखरे पुन्हा काबीज केली. युद्धाच्या काळात हवाई दलाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. येथील स्थानिक जनतेनेही सैन्याला नेहमीच पाठिंबा दिला आहे. भविष्यात आपल्याला आणखी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो आणि त्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण तयार असले पाहिजे.