लखनऊ : उत्तर प्रदेशातील शामलीमध्ये शानम नावाच्या मुस्लिम मुलीने इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला आहे. यानंतर तिने तिचा प्रियकर रुपकसोबत मंदिरात लग्न केले. शानम आता शालिनी म्हणून ओळखली जाईल. यापूर्वी तरुणीच्या नातेवाईकांनी रुपकचे अपहरण केले होते. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण शामली जिल्ह्यातील झिंझाना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे. येथील गुर्जरपूर गावातील रहिवासी शानम खातून आणि शेजारील गावातील रहिवासी रुपक यांच्यात सुमारे दीड वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघांनाही लग्न करायचे होते. मात्र मुलीच्या कुटुंबीयांना हे मान्य नव्हते. अशा स्थितीत दोघेही घरातून पळून गेले. याबाबत शुक्रवारी (२१ जुलै २०२३) मुलीच्या नातेवाईकांनी रुपकवर मुलीचे अपहरण केल्याचा आरोप केला.
मात्र, नंतर पोलिसांनी दोघांनाही पकडून न्यायालयात हजर केले. जिथे मुलीने आपण स्वत: रुपक सोबत पळून गेल्याचे कबूल केले. यानंतर रुपक आणि शालिनीचे सोमवारी (२४ जुलै २०२३) भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मंदिरात लग्न केले. यासर्व प्रकरणावर बोलताना शानम म्हणाली की, माझे पूर्वज एकेकाळी हिंदू होते. म्हणूनच मी हिंदू धर्म स्वीकारुन रुपकशी लग्न केले. मला कट्टरपंथी विचारसरणीच्या मुस्लिमांकडून त्रास होत होता.