ज्ञानवापीच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाला सुरुवात; मुस्लिम पक्षाचा विरोध कायम

24 Jul 2023 11:41:22
 DHAYANWAPI
 
लखनऊ : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) चे २४ सदस्यीय पथक ज्ञानवापीचे आज सर्वेक्षणाचे करणार आहे. याकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नाही म्हणून शहरात प्रशासन हाय अलर्टवर असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सोमवारपासून (२४ जुलै २०२३) होणार्‍या या सर्वेक्षणात हिंदू पक्षाने सहकार्याचे आश्वासन दिले असले तरी मुस्लिम पक्षाने सर्वेक्षणाची तारीख वाढवण्याची मागणी केली होती.
 
शुक्रवारी (21 जुलै 2023) जिल्हा न्यायालयाने परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एएसआय टीम रविवारीच वाराणसीला पोहोचली होती. त्याच दिवशी वाराणसीच्या जिल्हा प्रशासनाने हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षांना समोरासमोर बसवून दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या सर्वेक्षणाची माहिती दिली होती.
 
सध्या सर्वेक्षण सुरू झाले आहे. मुस्लिम पक्षाने या सर्वेक्षणात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाच्या सुरू असलेल्या सुनावणीचा दाखला देत मुस्लिम पक्षाने सर्वेक्षणाची तारीख वाढवण्याची मागणी केली होती. पण मुस्लिम पक्षाची ही मागणी फेटाळण्यात आली.
 
२१ जुलै रोजी वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. हिंदू पक्षाने दाखल केलेल्या याचिकेवर हा आदेश देण्यात आला होता. आदेशानुसार वजूखाना वगळता अन्य ठिकाणचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मुस्लिम बाजूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीने जिल्हा न्यायालयात ज्ञानवापी कॅम्पसचे वैज्ञानिक सर्वेक्षण करण्याच्या मागणीला विरोध केला होता.
 
 
Powered By Sangraha 9.0