मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मदन दास देवी यांचे सोमवार, दि. २४ जुलै रोजी सकाळी बंगलोर येथे निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रचारक म्हणून अनेक वर्ष काम पाहिले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ते संघटन मंत्री होते. तसेच सहसरकार्यवाह म्हणूनही त्यांनी यापूर्वी काम पाहिले आहे.
मदन दास देवी यांचं मुळ गांव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा. शालेय शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी पुण्यातील बीएमसीसी कॉलेजमधून त्यांनी एम.कॉम पुर्ण केले. यानंतर आयएलएस लॉ कॉलेजमधून गोल्ड मेडल पदकासह एलएलबीची डिग्री मिळवली. पुढे चार्टर अकाउंटंटची परीक्षेतही उत्तीर्ण झाले.
पुण्यात शिक्षण घेत असताना वरिष्ठ बंधू खुशालदास देवी यांच्या प्रेरणेनी त्यांनी संघकार्यात सहभाग घेतला. राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या कार्यासाठी ते १९६९ पासून संघ प्रचारक म्हणून कार्यरत झाले. त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून अभाविपमध्ये प्रदेश, क्षेत्रीय या जबाबदारी नंतर अ.भा. संघटन मंत्री म्हणून पूर्ण देशभरात तालुका- महाविद्यालय-शहर स्तरावर संस्कारित कार्यकर्ता समूह उभा राहील यासाठी विशेष लक्ष दिले.
त्यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहसरकार्यवाह आणि संघटन कौशल्याने संपन्न असलेल्या मदनदासजी देवी आता आपल्यात नाही. याचे मला अतीव दु:ख झाले आहे. त्यांचे मार्गदर्शन घेण्याची संधी मला नेहमीच मिळाली. लहानपणापासूनच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी आणि संघकार्यासाठी समर्पित केले होते. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती!"
मदनदासजी....'अभाविप'साठी संघाच्या माध्यामातून दिलेले पहिले प्रचारक
मदनदासजी यांच्या जाण्याने संघ परिवारातील प्रत्येक स्वयंसेवकाने आपाला जवळचा ज्येष्ठ सहकारी गमावला आहे. मागील अनेक वर्षांपासून शारीरिक अस्वास्थ्याशी त्यांचा संघर्ष सुरु होता. आज पहाटे त्या संघर्षाला अतीव दु:खदायक विराम मिळाला. मदनदासजी हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसाठी संघाच्या माध्यमातून दिले गेलेले पहिले प्रचारक होते. अनेक वर्षे त्यांनी अभाविपचे संगठन मंत्री म्हणून दायित्व सांभाळले. स्वर्गीय यशवंतराव केळकरजींच्या सानिध्यात त्यांनी संगठन कलेला परिपूर्ण केले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- डॉ. मोहनजी भागवत, सरसंघाचलक आणि दत्तात्रेयजी होसबाळे, सरकार्यवाह