मुंबई : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना जवळपास १ लाखांहून अधिकपर्यंतचे मोबाईल आणि लॅपटॉप मिळणार आहेत. दरम्यान, केंद्र सरकारकडून यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. तसेच, यासोबतच सरकारी अधिकारी चार वर्षांसाठी त्यांचा वैयक्तिक वापर करू शकतील, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.
केंद्र सरकारचे उपसचिव आणि त्यावरील सर्व अधिकारी अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी पात्र असून विभाग अधिकारी आणि उपसचिवांच्या बाबतीत अशी उपकरणे मंजूर क्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंतच्या मर्यादेत दिल्या जाऊ शकतात.
दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांकरिता हा महत्त्वपूर्ण निर्णय असून वित्त मंत्रालय विभागाने याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे निवेदनाद्वारे जारी केली आहेत. त्यानुसार, ज्या अधिकाऱ्यांसाठी ही सुविधा उपलब्ध आहे ते अधिकृत कामासाठी मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट, फॅबलेट, नोटबुक, नोटपॅड, अल्ट्रा-बुक, नेट-बुक किंवा अन्य उपकरणे १.३ लाख रुपयांपर्यंत घेऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.