ठाणे जिल्ह्यातील तानसा धरण तुडुंब; परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

23 Jul 2023 21:54:38
Thane Tansa Dam OverFlow Alert to the villages

ठाणे
: ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महापालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने पाऊस सुरू आहे. या संततधार पावसामुळे तानसा धरण तुडुंब भरून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

गेले काही दिवस पावसाची संततधार सुरु असुन जिल्ह्यातील नद्या, तलाव आणि धरणे ओसंडुन वाहत आहेत. जिल्ह्यातील तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडी इतकी आहे. शनिवारी ही पातळी १२६.६०२ मीटर टीएसडी हुन जास्त झाली आहे. त्यामुळे लवकरच हे धरण ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तानसा धरणाखालील व नदीच्या परिसरातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणातून विसर्ग होत असताना ग्रामस्थांनी काळजी घ्यावी. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने दक्ष राहावे, अशा सुचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0