सोमनाथ ताडोबा सफारी गेटमुळे रोजगाराच्या संधी : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

23 Jul 2023 22:23:34
Somnath Tadoba Safari Creates Employment

चंद्रपूर
: “ ‘ताडोबा अंधारी व्याघ्र’ प्रकल्पातील सोमनाथ सफारी गेटच्या माध्यमातून पर्यटकांना जंगल भ्रमंतीसह व्याघ्र पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. विशेष म्हणजे या नव्या गेटच्या निमित्ताने तरुणांसाठी रोजगाराचे एक नवे दालन खुले झाले आहे,” असे प्रतिपादन राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मूल तालुक्यातील सोमनाथ देवस्थान येथे सोमनाथ सफारी पर्यटन गेटचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सोमनाथ ताडोबा सफारी गेटचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला हरीश शर्मा, जिल्हाधिकारी विनय गौडा, राहुल पावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगांवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपसंचालक (बफर) कुशाग्र पाठक, माजी जि.प.अध्यक्षा संध्याताई गुरुनुले, अल्का आत्राम आदींची उपस्थिती होती.

यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “सोमनाथ गेट पर्यटकांसाठी खुले करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती. गावातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने ताडोबा सफारीसाठी गेट निर्माण करावा, अशी सूचना केली होती. या मागणीचा सन्मान करत वन विभागाला सूचना केल्या व पर्यटकांच्या आनंदासाठी तसेच तरुणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी गेट सुरू करण्यात आला आहे.

पावसामुळे ताडोबा येथील कोअरमध्ये प्रवेश बंदी असते. मात्र, बफरमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. चंद्रपूर जिल्ह्यात ‘वंदे मातरम् १९२६’ यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये अवैध वृक्षतोड, अवैध शिकार तसेच कामचुकार अधिकार्‍यांच्या बाबतीत तक्रार दाखल करता येणार आहे,” असेही मुनगंटीवार म्हणाले.

मृताच्या कुटुंबीयांना आता २५ लाख

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास २० लाखांऐवजी आता २५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा मुनगंटीवार यांनी केली. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी व्यक्तीला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेल्यास पाच लाख, तर खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यास १ लाख, २५ हजारांची मदत दिली जायची. आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी व्यक्तीस कोणत्याही खासगी दवाखान्यात उपचारासाठी पाच लाखापर्यंतची मदत देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

Powered By Sangraha 9.0