समाजकार्याचा तळपता ‘प्रदीप’

23 Jul 2023 20:19:12
Rotary Club of Dombivli Midtown President Pradeep Keshav Budbadkar

नुकतीच ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’च्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारलेल्या आणि पाणीसमस्येवर मात करण्याचा विडा उचललेल्या प्रदीप केशव बुडबाडकर यांच्याविषयी...

प्रदीप यांचे मूळ गाव दापोलीमधील पालगड. त्यांचा जन्म मुंबईतील प्रभादेवीचा. त्यांचे शालेय शिक्षण दादरमधील शारदाश्रम विद्यामंदिर येथे झाले. दहावीनंतर महाविद्यालयीन शिक्षणाकडे न वळता ते व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे वळले. त्यासाठी एका खासगी संस्थेतून ‘डिप्लोमा इन इलेक्ट्रानिक्स’ला त्यांनी प्रवेश घेतला. पदविका अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लगेचच नोकरी शोधण्यास सुरुवात केली. १९९९ साली ते नोकरीमध्ये रुजू झाले. पण, फार काळ नोकरी करायची नाही, हे त्यांनी मनाशी पक्के केले होते. प्रदीप यांचे वडील केशव बुडबाडकर हे ‘टेक्सटाईल मिल’मध्ये कामाला होते, तर आई रुक्मिणी ही गृहिणी होती. आईवडील, प्रदीप आणि त्यांची चार भावंडे असे त्यांचे कुटुंब. घरची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने प्रदीप यांना कधीही परिस्थितीचे चटके सहन करावे लागले नाही.

प्रदीप यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड. इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘उत्सव मंडळा’ची स्थापना केली होती. या उत्सव मंडळांतर्गत सोसायटीत गणोशोत्सव, नवरात्रोत्सव, क्रीडा स्पर्धा, सत्यनारायणाची पूजा, सहली असे विविध उपक्रम राबविले जात होते. हे सर्व उपक्रम राबविताना निधी जमा करणे, ही एक मोठी कसरत. सुरुवातीला प्रदीप यांच्या या कामाला विरोधही झाला. पण, त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम मात्र सुरूच ठेवले. त्यांच्या या सामाजिक कार्याचा वारसा आता पुढील पिढी चालवित आहे. सोसायटीतील या उत्सव मंडळाची धुरा नव्या पिढीकडे त्यांनी सोपविली असून आजही पिढी ही जबाबदारी अगदी लीलया पेलता असल्याचे प्रदीप प्रकर्षाने अधोरेखित करतात.

प्रदीप यांनी सन १९९० ते २००० अशी दहा वर्षे सलग नोकरी केली. त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसायासाठी मुंबईत जागा घेणे प्रदीप यांना परवडणारे नव्हते. त्यामुळे प्रदीप यांनी डोंबिवलीत जागा घेतली आणि ते स्वतःदेखील डोंबिवलीकर झाले. शिवाय ‘एमआयडीसी फेज एक’मध्ये त्यांनी आपल्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. व्यवसायात पाऊल ठेवल्यानंतर त्यांनी आपला सामाजिक कार्याचा वसा सोडला नाही. आपल्या परीने ज्यांना जितकी मदत करता येईल, तेवढी करण्याचा ते प्रयत्न आजही करतात. अनेक सामाजिक संघटनात्यांना आर्थिक मदतीसाठी संपर्क करीत असतात. त्यांनाही शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न प्रदीप करतात.त्यांच्या गावी ज्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज असते, ती मदत ते करीत असतात.

२००४ पासून मुलांना शैक्षणिक आर्थिक मदत करण्यास त्यांनी सुरुवात केली. हा यज्ञ आजतागायत तसाच सुरू आहे. प्रदीप यांचे कर सल्लागार असलेले आणि ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’चे माजी अध्यक्ष गुलाब पोवळे हे काम पाहतात. पोवळे यांनी एकेदिवशी प्रदीप यांच्यासमोर ‘रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन’चे सभासद होण्याचा प्रस्ताव समोर ठेवला. प्रदीप यांना लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड तर होतीच. त्यात ‘रोटरी क्लब’च्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी एक चांगले व्यासपीठ उपलब्ध होईल, म्हणून प्रदीप यांनी लगेचच पोवळे यांच्या प्रस्तावास होकार दर्शविला. त्यामुळे समाजासाठी जे काम प्रदीप वैयक्तिक पातळीवर करीत होते, ते काम आता ‘रोटरी क्लब’च्या माध्यमातून प्रदीप करू लागले. पुढे २०१४ मध्ये ’रोटरी क्लब’च्या संचालकीय मंडळात प्रदीप सामील झाले.

त्यानंतर त्यांनी ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’चे उपाध्यक्ष, सदस्यत्व संचालक, संचालकपद, सचिव, खजिनदार अशी विविध पदे भूषविली. ही पदे भूषविताना संस्थेच्या कामांसाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो, विविध प्रकल्पांसाठी आर्थिक मदत करावी लागते आणि प्रकल्पात प्रत्यक्ष सहभाग असावा लागतो, या सर्व बाबतीत प्रदीप यांच्या पूर्वानुभवामुळे त्यांनी संघटनेत विविध पदे भूषविली. आता त्यांनी ‘रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन’च्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘रोटरी क्लब’च्या माध्यमातून त्यांनी यापूर्वी शहापूर आणि मुरबाड या परिसरात मच्छरदाणीचे वाटप केले आहे. या परिसरात सर्पदंशाचे प्रमाण जास्त आहे. हे लक्षात घेता, या भागात रक्तदान शिबिरांचेही वेळोवेळी प्रदीप यांनी आयोजन केले होते.

प्रदीप यांनी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर, आगामी वर्षांत ‘रोटरी क्लब’च्या माध्यमातून विविध प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. पण, त्यातही त्यांचा भर हा प्रामुख्याने पाणीसमस्येवर असणार आहे. शहापूर आणि परिसरात पशुपक्ष्यांसाठी पाटबंधारे बांधण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच या परिसरातील नागरिकांना आजही पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यांच्यासाठी शेततळे आणि बोअरवेल उभारणार असल्याचेही ते सांगतात. या भागातील काही शाळा दत्तक घेऊन त्यांना सोईसुविधा पुरवण्याचाही प्रदीप यांनी निश्चय केला आहे. तसेच मुलींच्या आरोग्यासाठी ग्रामीण पाड्यातील मुलींना उकडलेली अंडी आठवड्यातून दोनदा देण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच, वृक्षरोपणासारखे विविध उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे प्रदीप यांनी सांगितले.

प्रदीप यांना ‘बेस्ट रोटरीयन’ पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे. समाजासाठी जितके शक्य होईल, तितके काम करायचा प्रदीप यांचा मानस आहे. अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.


Powered By Sangraha 9.0