ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर नव्याने उभारण्यात आलेल्या प्रतीक्षालयाचे लोकार्पण दि. २३ जुलै रोजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख केदार दिघे, नरेश मणेरा, उपजिल्हाप्रमुख कृष्णकुमार कोळी, संजय घाडीगावकर तसेच शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकातील जुनी इमारत निष्कासित करून ठाणे रेल्वे स्थानकाचा विकसित आराखडा तयार करण्यात आला आहे. संसदेत ठाणे रेल्वे स्थानक आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे स्थानक करण्यासाठी ठाण्याचे खा. राजन विचारे यांनी वारंवार मुद्दा उपस्थित केला होता. याची दखल घेऊन रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील १० रेल्वे स्थानकांच्या विकास कामांमध्ये ठाणे रेल्वे स्थानकाचा समावेश करून प्लॅटफॉर्म लेव्हल, रूप प्लाझा लेव्हल अशी तळमजला+२ दोन मजली इमारत तयार करून विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.
यासाठी खा. विचारे यांनी रेल्वे प्रबंधक, रेल्वे महाव्यवस्थापक तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री या सर्वांचे रेल्वे प्रवाश्यांच्यावतीने आभार मानले आहेत. रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा वाढणारा अतिरिक्त भार लक्षात घेता या जुन्या इमारतीच्या जागेवर प्रतीक्षालय उभारून रेल्वे प्रवाशांसाठी आज खुला करण्यात आला आहे. या प्रतीक्षालयामध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे खा. विचारे यांनी विनंती केली आहे.
फलाटांवरील फरफट टळली
रेल्वे प्रवाशांना विनाकारण फलाटावर उभे राहून गाडीची प्रतीक्षा करावी लागत होती ती आत्ता होणार नाही. त्यामुळे या नवीन उभारण्यात आलेल्या प्रतीक्षालयात लोकल गाड्यांचे व लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे इंडिकेटर बसविण्यासाठी आपला खासदार निधी रेल्वे प्रशासनाला उपलब्ध करून देणार असल्याचे सांगण्यात आले.
रखडलेल्या रेल्वे पादचारी पुलाचे काम लवकरच
ठाणे रेल्वे स्थानकात मुंबई व कल्याण दिशेस पादचारी पुलाचे काम निधीअभावी रखडले होते. या पादचारी पुलाकरिता ठाणे महापालिकेने ४ कोटी निधी रेल्वेकडे वर्ग केला असून याचे काम लवकर सुरु करण्यासाठी मेगाब्लॉक घेऊन या पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरु होणार आहे. असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. निधी वर्ग केल्याबद्दल खा. राजन विचारे यांनी महापालिका आयुक्तांचे आभार मानले.