मुंबई : रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या इर्शाळवाडी गावावर बुधवारी दरड कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. इर्शाळवाडीत गेल्या दोन दिवसांपासून बचावकार्य सुरु आहे. अजूनही काही गावकरी ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली आहे. या दुर्घटनेबाबत अनेकांनी हळहळ व्यक्त केली. यात अनेक कलाकारांनीही त्यांच्या भावना समाज माध्यमातून व्यक्त केल्या. अभिनेत्री जुई गडकरीने सुद्धा या संदर्भात पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केले होते. आता अभिनेत्रीने पुढाकार घेत येथील ग्रामस्थांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. जुईची टीम जीवनावश्यक वस्तू इर्शाळवाडीतील नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहे.
जुईने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर ही माहिती सर्वांना दिली आहे. यामध्ये अभिनेत्री लिहिते, “इर्शाळवाडीसाठी मदत पाठवायची असल्यास कृपया मला मेसेज करा. पंचे, चादरी, औषधे, कपडे, चपला, जेवण इत्यादी जीवनावश्यक वस्तू इर्शाळवाडीपर्यंत माझ्या टीमकडून पोहोचवल्या जातील…”जुईने काही महिन्यांपूर्वी इर्शाळगडाला भेट दिली होती. त्यावेळी अभिनेत्री तेथील स्थानिक लोकांच्या घरात जेवली होती. त्यामुळे ही दुर्घटना घडल्यावर जुईने हळहळ व्यक्त करत आता ग्रामस्थांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यापूर्वीच्या पोस्टमध्ये अभिनेत्रीने इर्शाळवाडी या उंचावर असणाऱ्या गावात वीज, मेडिकलची सुविधा नसल्याचे म्हटले होते.