बॉलिवूडमधील प्रसिद्ध रोशन कुटुंबीयांवर आधारित माहितीपट लवकरच येणार....

22 Jul 2023 19:30:29
 

roshan family



मुंबई :
हिंदी मनोरंजनसृष्टीला अनेक कलाकार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा वारसा लाभला आहे. अनेक कलाकारांनी पिढ्यानपिढ्या प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यात रोशन कुटुंबीयांचाही समावेश आवर्जून केला जातो. गेल्या तीन पिढ्या दिग्दर्शन आणि अभिनय क्षेत्रात दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांना देण्याचे काम राकेश रोशन दिग्दर्शनातून आणि ह्रतिक रोशन अभिनयातून सातत्याने करत असल्याचे दिसून येते. नुकतीच ह्रतिकने त्याचे आजोबा ज्येष्ठ संगीतकार दिवंगत रोशन लाल नागराथ यांच्या १०६ व्या जयंती निमित्ताने पोस्ट केली होती. दरम्यान, पिंकव्हिलाने दिलेल्या बातमीनुसार राकेश रोशन आणि ह्रतिक रोशन आपल्या कुटुंबाची कथा एका माहितीपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर लवकरच मांडणार आहेत. गेली अनेक वर्ष संगीत, दिग्दर्शन आणि अभिनयातून प्रेक्षकांचे रोशन कुटुंबाने कसे मनोरंजन केले हे या माहितीपटातून दाखवण्याचा राकेश रोशन यांचा प्रयत्न असणार आहे, अशी माहिती पिंरव्हिलाने दिली आहे. राकेश रोशन या माहितीपटाची निर्मीती करणार आहेत.
 
या माहितीपटाची सुरुवात राकेश रोशन यांचे वडिल रोशन लाल नागरथ १९४७ साली मुंबईत कसे आले आणि आपल्या कष्टाने त्यांनी स्वत:ला यशस्वी संगीतकार म्हणून १९५० ते १९६० हा काळ कसा गाजवला आणि कशी ओळख मिळवून दिली याबद्दल माहिती दाखवली जाणार आहे. त्यानंतर त्यांचा हा वारसा त्यांचे सुपुत्र राकेश आणि राजेश रोशन यांनी दिग्दर्शन आणि संगीतसृष्टीत कसा पुढे घेऊन गेले हे दाखवणार असून पुढे राकेश रोशन यांचा मुलगा ह्रतिक रोशन कसा उत्कृष्ट अभिनेता म्हणून नावारुपास आला याचा संपूर्ण इतिहास दाखवत रोशन कुटुंबाने मनोरंजनसृष्टीला दिलेल्या योगदानाची माहिती सांगण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0