राजकारणात घडणार्या घडामोडींचे एकमेकांशी संदर्भ जोडले की, आपसूकच एक पूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहू लागते. म्हणजे ऐन संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच मणिपूरमधील ‘त्या’ जुन्या लज्जास्पद व्हिडिओमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. मोदींच्या परदेश दौर्यावेळी मुद्दाम त्यांच्या विकासपुरूष या प्रतिमेला काळीमा फासण्यासाठी धार्मिक, वांशिक दंगलींच्या घटनांचा अगदी पद्धतशीर वापर केला जातो. याचाच अर्थ, या सगळ्या घटना निव्वळ योगायोग नसून, ते पद्धतशीरपणे देशाविरोधात नियोजित एक षड्यंत्रच आहे. त्यामुळे २०२४ची राजकीय लढाई ही आता सर्वार्थाने सुरू झाली आहे. परंतु, ही लढाई केवळ सत्य-असत्याची, विष आणि अमृताची नव्हे, तर हिंदू एकतेचीही सर्वस्वी परीक्षा पाहणारी ठरणार आहे.
२०२४च्या राजकीय युद्धाचा प्रारंभ झाला आहे. भारताची सुरक्षा आणि पाश्चात्त्यांनी पोषित केलेल्या ‘इंडिया’च्या आक्रमणापासून आपली सुरक्षा यांमधील हे मंथन आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय संस्कार आणि संस्कृतीच्या तत्त्वांना विजयी व्हावेच लागेल. असे काय घडले की, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरच बिभत्स आणि लज्जास्पद घटनांच्या बातम्या आणि त्यावरील वैश्विक प्रतिक्रिया एकाएकी धडकू लागल्या? नेमके काय कारण आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत गौरवशाली विदेश दौर्यानंतर सेक्युलर तबलिगी जमातीचे सदस्य फ्रान्समधील नरेंद्र मोदी यांचा सन्मान, ‘बेस्टिल डे परेड’मध्ये मोदींची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती, यावरुन प्रश्न निर्माण करतात आणि मोदी भारतात परतल्यानंतर देशाची मान शरमेने खाली घालणार्या ‘त्या’ घटनांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केले जातात, ज्यामुळे देशविदेशात एकच खळबळ माजते.
नेमके काय कारण आहे की, मानवतेला मान खाली घालायला लावणार्या अशा घटनांचे राजकीय भांडवल केले जाते? आणि प. बंगाल, राजस्थानमधील मातृशक्तीच्या दुर्दांत अपमानावर मात्र सोयीस्कररीत्या मौन बाळगले जाते आणि केवळ मोदींना लक्ष्य करण्यासाठी अशा अमानवीय घटनांचा पाशवी वापर केला जातो? काय कारण आहे की, इस्लामी राक्षसीपणाची शिकार ठरलेल्या हिंदूंचा आवाज सर्वोच्च न्यायालय ऐकायला तयार नाही आणि दुसरीकडे मात्र गुजरातमधील हिंदूविरोधी हल्ल्यांवेळी मुस्लिमांची तळी उचलणार्या आणि त्या घटनाक्रमांतून असत्य ‘नॅरेटिव्ह’ निर्माण करणार्या तीस्ता सेटलवाडसाठी मात्र रात्री १० वाजल्यानंतरही न्यायालयाचे दरवाजे उघडले जातात? गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अपमानास्पद पद्धतीने नाकारत तीस्ता सेटलवाडला मात्र जामीन दिला जातो.
फार पूर्वीपासून जगामध्ये भारताची युद्धखोर आणि मुसलमानांच्या विरोधातील एक आक्रमक हिंदू देश, अशी प्रतिमा रंगवणार्यांचा एक हीन हेतू आहे. तो म्हणजे, भारतात हिंदूविरोधी तसेच इस्लामी-पाश्चिमात्त्यांच्या समर्थकांचा कळप सत्तेत यावा, जो मोदी-वाजपेयींपूर्वीची कणाहीन व्यवस्था तशीच पुन्हा गतिमान करेल. खरं तर आज भारताविरोधात पद्धतशीरपणे एक वैश्विक षड्यंत्र रचले जात आहे. त्याअंतर्गत भारताची कदापि प्रगती होता कामा नये, भारत स्वच्छ दिसता कामा नये, ‘चांद्रयाना’चे भारताने प्रक्षेपणच करू नये, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने झेप घेऊ नये, महामार्गांचे विकासाचे जाळे पसरता कामा नये, ’आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आणि ’सेमीकंडक्टर’ क्षेत्रात भारतात संशोधनच होऊ नये, भारतातील शिक्षित तरुण ‘भारत छोडो’ मानसिकतेतच कायम गुरफटून राहायला हवा आणि आपल्याला देशाबाहेरच जायचे आहे, असेच या तरुणांना सदैव वाटायला हवे, भारत नेहमी ज्ञान-विज्ञान क्षेत्रात नाही, तर दंगली, हिंदू-मुस्लीम प्रश्न, ईशान्य भारतातील संघर्ष-विवाद यासाठीच ओळखला गेला पाहिजे. वर उल्लेख केलेल्या या सगळ्या घटना आणि मानसिकतांवर आधारित भारत देशाची उभारणी जगातील शत्रू देश करू पाहत आहेत आणि मग असा भारत निर्माण व्हावा, यासाठी नेमके कोण काम करते आहे? म्हणूनच सध्या विरोधक फक्त मिथ्य कथा, असत्य आणि भ्रामक घोषणांच्या आधारावर कोणत्याही जनहिताच्या राष्ट्रीय मुद्द्यापेक्षा ‘मोदी हटाओ’ या एकमेव मुद्द्याला कवटाळून वाटचाल करताना दिसतात.
जगाचा विचार करता, भारतात महागाई दर सर्वात कमी आहे. परंतु, विरोधकांचे म्हणणे असे की, भारतात सर्वाधिक महागाई दिसून येते. जेव्हा भारत जगातील पहिल्या पाच अर्थशक्ती संपन्न देशांच्या यादीत गणला जातो, तेव्हा विरोधक मात्र म्हणतात की, भारताची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. एवढेच नाही तर भारत पहिल्यांदा संरक्षण सामग्रीच्या उत्पादनात ‘आत्मनिर्भर’ झाला आहे. ‘तेजस’सारखे लढाऊ विमान, ‘ब्राह्मोस’सारखे क्षेपणास्त्र आपण इतर देशांना निर्यात करीत आहोत. पण, विरोधक भारताच्या संरक्षण सज्जतेला कमकुवत आणि लाचार ठरवित ‘राफेल’सारख्या लढाऊ विमानांच्या खरेदीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करुन, सैन्याचे मनोबल खच्ची करताना आणि देशात एकप्रकारचा संभ्रम निर्माण करताना दिसतात. त्यामुळे विरोधकांचा सिद्धांत एकच आहे की, दिवसाही अंधारच आहे असे दाखवून समाजमाध्यमांवर, प्रचार साधनांचा गैरवापर करून सातत्याने बोंबा ठोकायच्या. म्हणजे सगळे नाही; पण किमान त्यापैकी काही लोक तरी मान्य करतील की, इतक्या वेळा अंधार आहे, म्हणून हे दवंडी पिटतात म्हणजेच खरोखरी प्रकाश नाही, तर अंधारच आहे!
पण, मला वाटतं सध्या घाबरण्यासारख्या दोनच गोष्टी आहेत. एक म्हणजे, राष्ट्रीय विचारांचे मतदार आणि समर्थक यांचा अतिआत्मविश्वास आणि दुसरे म्हणजे नेत्यांचा अहंकार. कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी आणि पक्षासाठी राजकीय लढाई लढतात खरी. पण, जर त्यांच्यामध्ये विन्रमता आणि सुचितेचा स्पर्श नसेल, तर कर्नाटकप्रमाणे विजयाकडे वळणारी पावलं पराजयाला कवटाळून बसतात. कर्नाटकमध्ये हिंदूंचा पराजय झालेला नाही. पण, केवळ काही राष्ट्रीय विचारांच्या नेत्यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांप्रतीचा रुक्ष व्यवहार, त्यांना त्याच जनतेपासून दूर लोटून गेला, ज्यांनी यापूर्वी त्यांच्यावर वारंवार विश्वास दर्शविला होता. म्हणूनच असे नेते हिंदूंबरोबर विश्वासघात करतात, असे खेदाने इथे नमूद करावे लागेल.
२००४ साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात रालोआचा विजय निश्चित होता. खरं तर रालोआ त्यावेळीही विजयीच ठरली असती, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. पण, दुर्देवाने ‘इंडिया शायनिंग’च्या मोहिमेने विजयाचा घास हिरावून घेतला. पण, आज एकमेकांचे कट्टर विरोधी असलेले हे राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते एकमेकांविषयी शत्रुत्वाचा भाव असूनदेखील, सत्ताकांक्षेच्या गोंदाने एकमेकांना चिकटलेले दिसतात. हे असे राजकीय पक्ष आणि नेतेच राजकारणाला हास्यास्पद ठरवत आहेत. या सगळ्याच राजकीय पक्षांचा कारभार वंशपरंपरागत जमीनदारांप्रमाणे गैरलोकशाही मार्गाने आपापल्या कौटुंबिक व्यक्तिकेंद्रित पद्धतीने सुरू आहे. मला सांगा, मग याला लोकशाही म्हणायचे का? पण, तरीही एका समान शत्रूला पराभूत करण्यासाठी ही मंडळी एकत्र येऊन गर्दी करुन बसली आहेत. अशा लोकांची कुठली अर्थ, संरक्षण, शिक्षणनीती असू शकते का? तर नाही, यांचा केवळ पैसे कमावण्याचा आणि तो वाटण्याचा खेळ रंगू शकतो, बाकी काही नाही! म्हणूनच या विषापासून भारतरक्षक महादेवच हे हलाहल कंठातच धारण करून देशाला वाचवू शकतात, असाच विश्वास ठेवावा लागेल. यावेळी हे महादेव म्हणजेच जनता जनार्दनाची अविजेय सामूहिक संघटित शक्ती ठरावी!
तरुण विजय
(लेखक राज्यसभेचे माजी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)