मी अनुभवलेले ‘मॅनेजमेंट गुरू’ देवेंद्रजी फडणवीस...

22 Jul 2023 22:06:41
Article On Deputy CM Devendra Fadnavis Written By Amit Gorkhe

देवेंद्रजी अभ्यासाशिवाय बोलणार नाही, हे त्यांचे विरोधकही पुरते जाणून आहेत. आपल्या कुशाग्र बुद्धीची सखोल अभ्यासाची प्रभावी नियोजनाची विलक्षण अशा रणनीतीची जोड देत देवेंद्रजी ज्या पद्धतीने राजकारणात वाटचाल करीत आहेत, ते पाहता त्यांचे भविष्य आणखी उज्वल असणार आहे, यात जराही शंका नाही.

आपण बालपणापासून काय मिळवतो आणि आपले अनुभवविश्व ज्ञानाने कसे समृद्ध करीत जातो, यावर आपली पुढची वाटचाल अवलंबून असते. माझ्या २५ वर्षांच्या वाटचालीत माझ्यावर राजकीय प्रभाव टाकणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे देवेंद्रजी फडणवीस. व्यक्तिमत्त्व घडवणे, ही कष्ट साध्य आणि प्रयत्नांती प्राप्त होणारी बाब आहे, हे त्यांच्यासोबत काम करताना जाणवले. काही संस्कार जडणघडणीतून आलेले असतात, तर काही अथक परिश्रमातून व मेहनतीने व्यक्तिमत्त्वात आणले जातात. माणसे उगीच मोठी होत नाहीत, त्यामागे अथक प्रयत्नांची मालिका असते. राजकारणात राहून सुसंस्कृतपणा जपणं अत्यंत अवघड असते. कोणत्याही माणसाच्या जीवनाला आकार येताना काही गोष्टी महत्त्वाच्या ठरत असतात.

देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, हे नाव सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात ठळकपणे उठून दिसतय. गेल्या ३० पेक्षा अधिक वर्षांपासून ते सक्रिय राजकारणात आहेत. एकेकाळी ’मॉडेल’ म्हणून काम केलेले देवेंद्रजी फडणवीस गेल्या काही दिवसांच्या राजकीय नाट्याचे दिग्दर्शकच आहेत. देवेंद्रजींच्या राजकारणातला प्रवेश हा इतर राजकारण्यांच्या तुलनेत सोपा होता. मात्र, राजकारणातली आजवरची वाटचाल ही कष्टसाध्य आहे. जेव्हा ते नगरसेवक म्हणून निवडून आले, ते साल होतं १९९२. ही निवडणूक १९८९ मध्ये होती. पण, तेव्हा त्या निवडणुकीत त्यांचे वय भरत नव्हतं. मात्र, नशिबाने ही निवडणूक पुढे गेली व त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

जडणघडणीच्या काळामध्ये जर आयुष्यासमोर काही आदर्श व्यक्ती प्रेरणास्थान म्हणून उभ्या राहिल्या, तर आयुष्याला परिसस्पर्श लाभतो आणि अवघ्या आयुष्याचे सोने होते. त्यामुळे आयुष्यामध्ये आपण करीत असलेल्या कामामागे कोणाची प्रेरणा आहे, हा विषय खरोखरीच महत्त्वाचा ठरतो. प्रेरणेतून जी ऊर्जा निर्माण होते, ती चिरकाल टिकणारी आणि आयुष्याला एक वेगळीच गती देणारी ठरत असते. देवेंद्रजींनी अगदी लहानपणापासूनच हे मर्म बहुदा जाणलेले असावे. म्हणूनच राजकारणात खर्‍या अर्थाने प्रवेश केल्यानंतर त्यांनी भाजपचे नेते नितीनजी गडकरी यांच्या साथीने २०१३ मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद मिळवण्यात यश मिळवले. हे प्रदेशाध्यक्ष पद २०१४ला मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी चांगलंचकामी आलं.

व्यक्तीशः मला देवेंद्रजींचे व्यक्तिमत्त्व अनुकरणीय वाटतं. कोणताही राजकीय गुरू नसताना ध्येयाने आणि परिश्रमाने आजवरची केलेली त्यांची वाटचाल मला स्वतःला प्रेरणा देत असते. देवेंद्रजींची एक खासियत म्हणजे, त्यांची खासगी गुप्तचर यंत्रणा खूपच मजबूत आहे. त्यातून त्यांच्या विरोधात उभे राहिलेले आंदोलन व चळवळ यातील कच्चे दुवे ते बरोबर शोधतात आणि त्या कच्च्या दुव्याला ते आपल्याकडे ओढतात.

उत्तम प्रशासक अशी त्यांची प्रतिमा आहे. ते नेहमीच लोककल्याणाला समाजहिताला प्राधान्य देतात. त्यासाठी ते अखंडपणाने कार्यरत असतात. एका उत्तम संघटकाचे सारे गुण देवेंद्रजींमध्ये एकवटलेले आहेत. देवेंद्रजींचे जीवन त्या दृष्टीने आदर्शवत आहे, कारण ते नुसतेच जगत नाहीत, तर त्या जगण्याला अर्थपूर्णता देण्याचा प्रयत्न करतात. लोकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करायची असते. ’बोले तैसा चाले’ या उक्तीशी प्रामाणिक राहून नीतिमत्तेला धरून राजकारण करणारे असे देवेंद्रजींचे व्यक्तिमत्त्व आहे. राज्यभरात कार्यकर्त्यांचे जाळे त्यांनी विणलेले आहे. समयसूचकता, प्रसंगावधान, हजरजबाबीपणा अशा अनेक गुणांनी त्यांनी सगळ्यांना आपलेसे केलेले आहे.

राजकीय जीवनाच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणारे एक व्यक्तिमत्त्व हा या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक विशेष!

राजकारणात विचारधारा या वेगळ्या असू शकतात. परंतु, सगळ्यांना सामावून घेण्याच्या स्वभावामुळे व्यक्ती म्हणून देवेंद्रजी सर्वांना निश्चितपणे भावतात. त्यांची अथक कार्यमग्नता विलक्षण आहे, हे मी स्वतः अगदी जवळून अनुभवलेले आहे. त्यांच्या सर्व कामांना वेळेचे आणि नियोजनाचे कोंदण असते. ते प्रत्येक सेकंदाचे महत्त्व जाणून असतात. म्हणूनच आयुष्यातील कोणताही वेळ दवडू न देता ते सातत्याने स्वतःला कामामध्ये सक्रिय ठेवतात.

देवेंद्रजी फडणवीस हे अलीकडच्या राजकारण्यांपेक्षा वेगळे राजकारणी आहेत. त्यांच्या राजकारणाच्या पद्धतीविषयी कदाचित मतभेद होतील. पण, त्यांच्या सहिष्णू असण्यावर कोणाचा काही आक्षेप असेल, असे मला तरी वाटत नाही. मी जेव्हा देवेंद्रजींच्या सहवासात आलो, तेव्हा तेव्हा त्यांच्या प्रकांड बुद्धिमत्तेने प्रभावित होऊन गेलो आणि विविध विषयांमध्ये या व्यक्तिमत्त्वाचा किती सखोल अभ्यास आहे, हे मला त्यांच्या सहवासात लक्षात येत गेले. इतिहास, अर्थकारण, संस्कृती, शिक्षण, कृषी अशा विविध विषयांच्या बाबतीत त्यांची प्रगल्भता कायमच दिसून आलेली आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्येसुद्धा विविध विषयांचा दांडगा अभ्यास आणि स्वतःवरील दृढ आत्मविश्वास हीच खरी पुंजी ठरत असते आणि तीच आपल्याला परिस्थितीवर मात करण्याचे बळ देत असते, हे देवेंद्रजींच्या वाटचालीवरून आपल्याला समजते.

राजकीय जीवनात इतक्या वेगवान घडामोडी घडत असतात की, त्यावर विचार करत बसायलासुद्धा वेळ नसतो. अशावेळी तुमच्यातील अंगभूत क्षमता, एखाद्या विषयाशी असणारी बांधिलकी यांच्या बळावर अचूक निर्णय घेऊन आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागत असते. देवेंद्रजी हे वेगवान आणि अचूक निर्णय घेण्यात वाकबगार आहेत. त्यांनी नेहमीच चांगल्या निर्णयांनी आपण राजकारणात किती प्रभावी आहोत, हे वेळोवेळी दाखवून दिलेले आहे. देवेंद्रजींचे व्यक्तिमत्त्व हे केवळ पुरोगामी नाही, तर ते भविष्यातील प्रगतीचा वेध घेणारे आणि त्या दिशेने सातत्यपूर्ण वाटचाल करणारे आहे. संघटनात्मक पातळीवर आणि पक्षवाढीसाठी प्रयत्नशील असतानादेखील त्यांच्यातील निर्णय क्षमता किती प्रभावी आहे; हे लक्षात येते. सर्व प्रलोभनांचा त्याग करून स्वतःवर विजय मिळवण्याच्या दिशेने जाणारी व्यक्ती म्हणून देवेंद्रजींचे एक आदर्श व्यक्तिमत्त्व उभे राहते. प्रत्येक माणसाचे प्रत्येक क्षेत्रातील कर्तृत्व हे त्याच्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच त्याच्या अभ्यासू वृत्तीवरही अवलंबून असते.

व्यासंग हे व्यक्तिमत्त्वाच्या वेलीवर आलेले सुंदर फुल असते. ते व्यक्तिमत्त्वाचे सौंदर्य अधिक खुलवत असते. त्यातून आत्मविश्वासही वाढत असतो. या सगळ्यांचा परिपोष देवेंद्रजींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये पुरेपूर झाल्याचा दिसून येतो. राजकारणातील प्रत्येक अनुभव नवा धडा देत असतो, हे खरे. परंतु, अनुभवाच्या जोडीला जेव्हा अभ्यासाची साथ मिळते, तेव्हा व्यक्तिमत्त्वाला एक वेगळाच आकार येतो आणि दीर्घकालीन वाटचालीची सिद्धता येत असते. देवेंद्रजींच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहिल्यानंतर ते खरे आहे, हे लक्षात येते. राजकारणामध्ये त्यांनी नव्याने पाऊल टाकले, तेव्हापासूनच कोणताही विषय सांगोपांग सर्व बाजूंनी आणि सखोल पद्धतीने समजून घ्यायचा आणि मगच आपली राजकीय भूमिका निश्चित करायची, ही सवय त्यांनी स्वतःला लावून घेतली आहे. देवेंद्रजी अभ्यासाशिवाय बोलणार नाही, हे त्यांचे विरोधकही पुरते जाणून आहेत. आपल्या कुशाग्र बुद्धीची सखोल अभ्यासाची प्रभावी नियोजनाची विलक्षण अशा रणनीतीची जोड देत देवेंद्रजी ज्या पद्धतीने राजकारणात वाटचाल करीत आहेत, ते पाहता त्यांचे भविष्य आणखी उज्वल असणार आहे, यात जराही शंका नाही.

व्यवस्थापनशास्त्र विषयाशी संबंधित शैक्षणिक संस्था चालवण्याचा मला १५ वर्षांचा अनुभव गाठीशी असल्याने, व्यवस्थापकीय कौशल्याच्या बाबतीत देवेंद्रजींचे व्यक्तिमत्त्व विलक्षण आहे, हे मी अनुभवले आहे. अशा असंख्य कार्यकर्त्यांच्या मनावर राज्य करणार्‍या माझ्या आयुष्यातील ’राजकीय मनेजमेंट गुरू’ देवेंद्रजीं यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा!

अमित गोरखे
(लेखक भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख आहेत.)
९८२२२५४६७८

Powered By Sangraha 9.0