लखनऊ : इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने पकडले आहे. फैजान अन्सारी उर्फ फैज असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याला झारखंडमधील लोहरदगा येथून अटक करण्यात आली आहे. तो भारतात दहशतवादी हल्ल्याची योजना आखत होता.
एनआयएने प्रेसला जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे की, फैजान भारतात इस्लामिक स्टेटसाठी काम करत होता. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून इस्लामिक स्टेटचा प्रचार करत होता. सोशल मीडिया आणि त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने तो भारतात दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत होता.
फैजान अन्सारीच्या अटकेपूर्वी एनआयएने १६ आणि १७ जुलै रोजी झारखंडमधील लोहदरगा येथील त्याच्या निवासस्थानावर आणि उत्तर प्रदेशातील अलीगढ येथील त्याच्या भाड्याच्या निवासस्थानावर छापे टाकले होते. या छाप्यात एनआयएला अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि संशयास्पद साहित्य आणि कागदपत्रे सापडली. यानंतर एनआयएने फैजान अन्सारीविरुद्ध १९ जुलै रोजी देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.